Thursday, December 15, 2022

लेख

 दृष्टी आणि श्रवणापलीकडची अनूभुती !

 

संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तब्बल 75 पेक्षा अधिक शाळेतील मुले मोठ्या कुतहलाने, आत्मविश्वासाने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात जमले आहेत. या मुलात काही सहा वर्षाचे आहेत, काही सात, काही दहा तर काही पंधरा वर्षाचे आहेत. या मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांसाठी हा परिक्षेचा क्षण असल्यागत तेही मोठ्या उत्साहाने इथे दाखल झाले आहेत. हॉलच्या बाहेर काही मुले तयार होत आहेत. कोणी राम होत आहे तर कोणी लक्ष्मण तर कुठे वानरसेना शेपटी लावून तयार होत आहे.

 

हॉलमधील मुले एकमेकाच्या आधाराने आपले सादरीकरण करून बाहेर येत आहेत. यातील काही मुलांच्या चेहऱ्यांवर नवी धडकन जागविल्याचे भाव आहेत, तर काही मुलांच्या चेहऱ्यावर गाण्यातील बोलाप्रमाणे झाडाची सावली मिळाल्याचा आनंद आहे. बाहेर एका कोपऱ्यात ज्यांना ऐकू आणि बोलता येत नाही, अशा मुली संपूर्ण साजश्रृंगारासह तयार होऊन एकमेकीच्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास टिपून घेत आहेत. त्यांना खूप काही बोलायचे आहे. ऐकीचे हात विजेच्या गतीने वर होऊन बोटांच्या खुणातील परीभाषा झरझर बोलते करीत आहे. कोणाला फोटो काढून घ्यायचे आहेत. या साऱ्या मुलांच्या भावभावनाला तोलत शिक्षक या मुलांना सांस्कृतिक स्पर्धेसाठी विश्वासाने स्टेजकडे घेऊन जात आहेत.

 

एखादा शासकीय उपक्रमाला भावभावनांचे किती किनार असू शकतात याची प्रचिती कोरोना नंतरच्या तीन वर्षाच्या खंडानंतर अधिकारी आणि कर्मचारी समजून घेत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षे व जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धा सर्वांनाच खूप काही शिकवून जात आहे. किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालयातील मुलांनी वंदे मातरम गिताने राजेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ केला.   

 

समूह नृत्यामध्ये मुलांनी गितातील बोलानुसार ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्यानुसारच वेळेवर सादर करणे साध्या मुलांसाठी खूप आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. इथे तर क्षणाक्षणाला असंख्य बाबी विसरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गितातील शब्दानुसार हावभाव करून घ्यायचे आहेत. काही दृष्टीहीन मुले स्टेजवर आल्यावर आपले डोळे किलकिले करून मनातल्या मनात स्टेजवरील हॅलोजनचा स्पॉट लाईट उजळल्याचा भास करून घेत आहे. यातील काही मुलांना प्रेक्षक डाव्या बाजुला बसलेले आहेत असा भास झाल्यामुळे की काय त्याची मान सतत डाव्या बाजुला जात आहे.

 

जन्मापासूनच काही मुलांच्या डोळ्यावर लख्ख अंधाराचीच साथ दिली आहे. यातील काही मुलांना बोलते केल्यास तो आपल्या डोळ्यात उजळलेल्या लाखो किरणांची गोष्ट माहित आहे याची शाश्वती देत आहेत. ईश्वराने एक बाजु स्वत:कडे ठेवून एकच बाजु दिल्याबद्दल त्यांच्या मनात कोणती तक्रार नाही. एकमेकांना वाटेल तेवढे प्रेम व धैर्य देण्याची कसब त्यांनी अंगी बांधली आहे. या मुलांच्या मनातील ही ताकद पाहून शिक्षक आज पालकांच्याही कित्येक पलिकडे असलेल्या भुमिकेत स्वत:ला घेऊन गेले आहेत. आपल्या मुलांचे नृत्य चांगले व्हावे यासाठी स्टेजच्या समोर जिथून प्रकाश व ध्वनीची व्यवस्था झाली आहे त्या जागेवर उभे राहून स्वत: गिताच्या बोलाप्रमाणे फेर घेऊन तोही बेफाम नाचत आहेत. ज्यांना हात नाहीत त्यांचेही हात वर झाल्याचा भास हे पाहतांना होत आहे.    

 

या दोन दिवसीय या महोत्सवात पहिला दिवस हा क्रीडासाठी आणि दुसरा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशी विभागणी व्यवस्थापन मंडळाने केली आहे. कालच्या क्रीडा स्पर्धांना दिव्यांगानी भरभरुन प्रतिसाद दिला. ज्यांना चालता येत नाही त्यांना धावण्याचे बळ या स्पर्धांच्या माध्यमातून घेता आले. आजच्या सांस्कृतिक, समूहगान, सामूहिक नृत्य आदी स्पर्धांनीही जिल्ह्यातील या दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना नवी संधी मिळाली. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेत ज्यांना आजवर संधी मिळाली नाही त्यांच्या दारापर्यंत संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश सामाजिक न्याय विभागाच्या या स्पर्धेतून सफल झाला नसेल तर नवलच.

 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...