Tuesday, October 18, 2022

 ज्येष्ठांच्या सेवा-सुविधेसाठी प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▪️नांदेडचा विस्तार लक्षात घेता वृद्धाश्रमाची गरज
नांदेड (जिमाका) दि. 18 :- ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी प्रशासन तत्पर आहे. नांदेड सारख्या 16 तालुके असलेल्या जिल्ह्यात दोन वृद्धाश्रमासोबत आणखी वृद्धाश्रमाची निकड नाकारता येत नाही. ज्येष्ठांचे आरोग्य, त्यांच्या वयोमानुसार असलेल्या शाररिक मर्यादा लक्षात घेता प्रशासनासह सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या हिताच्या सेवा-सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रशासन दक्ष असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश डी. एम. जज, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक तेरकर, रामचंद्र देशमुख, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात व विशेषत: काही महत्वपूर्ण प्रसंगी बँकांमध्ये होणारी गर्दी स्वाभाविक असते. अशा वेळात ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्तीधारक यांची बँकांमधील असलेली कामे व तिथे लागणारा वेळ याचे नियोजन आवश्यक आहे. बँकांच्या समकक्ष आता पोस्ट कार्यालयातही बँकांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झालेले आहेत. यात पोस्टमन घरपोच येऊन सेवा-सुविधा देत असल्याने या सेवेकडे ज्येष्ठ नागरिकाने वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. शासकीय सेवा-सुविधा देतांना ज्येष्ठांसाठी प्राधान्याने विचार करून त्यांना आपल्या कार्यालयाशी असलेल्या योजना व सेवा अधिक तत्पर पोहचविण्याबाबत त्यांनी विभाग प्रमुखांना सूचित केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी ज्येष्ठांसाठी त्यांच्यासाठी असलेल्या सर्व योजनांची, त्यांच्या संदर्भात शासकीय कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या बाबींची एकत्रित अशी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
या बैठकीत ज्येष्ठांसाठी करमणुक केंद्र, बहुउद्देशीय केंद्र, ज्या भागात नवीन टाउनशिप विकसित होत आहे त्या भागात ज्येष्ठांसाठी अत्यावश्यक सुविधा, कौशल्य विकास विभागामार्फत ज्येष्ठांची देखभाल व त्यांची सुश्रृशा याबाबत इच्छितांना विशेष प्रशिक्षण देण्याबाबत त्यांनी कौशल्य विकास विभागाला सूचना केल्या. याचबरोबर ज्येष्ठांसाठीचे वैद्यकिय तपासणी शिबिरे यावरही नियोजन केले जाईल, असे सांगितले.
प्रारंभी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी ज्येष्ठांच्या विविध सेवा-सुविधा व शासन निर्णयात निर्देशीत केलेल्या बाबींची माहिती दिली. समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
000000



No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...