Thursday, August 25, 2022

 ई-पीक पाहणीसाठी जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम

 जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

·       जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांनी माहिती नोंदवावी यासाठी ही मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- खरीप हंगाम 2022 ची पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू करण्यात आली असून यात शंभर टक्के पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. तथापि या पाहणीत शंभर टक्के पिकाची नोंदणी होण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी 28 ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करून मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले आहे.

 

जिल्ह्यात एकुण 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे. यात गावांची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. अर्धापूर-64, उमरी-63, कंधार 123, किनवट 176, देगलूर 109, धर्माबाद 56, नांदेड 104, नायगाव 89, बिलोली 92, भोकर 79, माहूर 83, मुखेड 135, मुदखेड 54, लोहा 126, हदगाव 135 तर हिमायतनगर तालुक्यात 68 गावे आहेत. प्रत्येक गावासाठी उद्दीष्टानुसार प्रती गाव दहा प्रमाणे एकुण 15 हजार 560 स्वयंसेवकाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक स्वयंसेवकामार्फत किमान 20 शेतकऱ्यांची नोंदणी याप्रमाणे एकुण 3 लाख 11 हजार 200 म्हणजेच 2 लाख 80 हजार 882 उद्दीष्टांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

 

सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करण्यासाठी तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, तरुण मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांची त्या-त्या गावातील पीक पेरा भरून घेण्याबाबत मदत घेतली जाईल.

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...