Saturday, July 9, 2022

 नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा

सोयाबीन पेरणीचा प्रयोग अनुकरणीय

- कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्यात दिनांक 8 जून रोजी विविध ठिकाणी भेटी देऊन पीक पेरणीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. कासारखेडा तालुका नांदेड येथे शेतकऱ्यांनी बेडवर टोकन पद्धतीने व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक व अभिनंदन त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे तयार करून स्वतः यावर्षी वापरले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीबीएफ आणि टोकन पद्धतीने पेरणी झाली असून उगवण चांगली झाली आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असून या पद्धतीचा इतर शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी केले. 

कासारखेडा हे गाव राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत निवडले असून या गावात 100 हेक्टर वर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव,  मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील , सतिश सावंत, कृषी पर्यवेक्षिका शिंदे सुप्रिया, कृषी सहायक वसंत जारीकोटे, चंद्रकांत भंडारे, देवजी बारसे, रमेश धुतराज, कृषी मित्र उमेश आढाव, राजाराम शिंदे, सोनाजी आढाव, शिवदास कडेकार, राष्ट्रपाल झिंझाडे, आत्मा यंत्रणेचे बिटीएम चंद्रशेखर कदम, भालकी गावचे उपसरपंच राजू धाडवे, दशरथ आढाव आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 

धामदरी तालुका अर्धापूर येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेस भेट देऊन सौ. गंगाबाई शामराव कदम या महिला शेतकऱ्याचे कौतुक केले. या ठिकाणी मागील वर्षभरात सुमारे 25 लाख भाजीपाला  रोपे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. यामधून सदरील महिलेस सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा नफा झाला आहे अशा पद्धतीच्या रोपवाटिका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उभाराव्यात असे आवाहन एकनाथ डवले यांनी यावेळी केले. 

यावेळी धामधरी येथील महिला शेतकऱ्यांना श्री डवले यांचे हस्ते महाबीजचे भाजीपाला मिनीट बियाणे वाटप करण्यात आले. भाजीपाल्याचा महिला शेतकऱ्यांनी आपल्या आहारात व कुटुंबाच्या आहारात समावेश करावा, असेही एकनाथ डवले यांनी सांगितले. या ठिकाणी दिगांबर रामराव कदम यांचे शेतावरील बीबीएफ वरील पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, तालुका कृषि अर्धापूर संजय चातरमल, अर्धापुर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी , शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय कदम,  गावचे सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000



No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...