Saturday, June 25, 2022

यशकथा

 सुधारित यशकथा- 

लालू वाघमारेच्या विहिरीत जेंव्हा ढग उतरतात ! 

नांदेड येथून तेलंगणातल्या निजामाबादकडे जाण्याचा रेल्वे मार्गावर धर्माबाद शहर लागते. शारदा देवीच्या बासर रेल्वे स्थानकाच्या आगोदरचे रेल्वे स्थानक म्हणजे धर्माबाद. तेलंगणाच्या काठावर हा तालुका असल्याने स्वाभाविकच इथल्या देहबोलीत तेलंगणाचा अधिक प्रभाव दिसून येतो. धर्माबाद तालुक्याला गोदावरी नदीचे वरदान तर आहेच. याहीपेक्षा येथील बाभळी बंधाऱ्याने कृषि क्षेत्राला संपन्नता दिली आहे. धर्माबाद हे मिरचीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध आहे. इथली जमीन आणि पाणी सर्वांच्याच वाट्याला मुबलक आहे असे मात्र नाही. 

लालू संभाजी वाघमारे हा मुबलक पाणी आणि चांगल्या जमिनीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी एक. धर्माबाद येथून अवघ्या 10 कि.मी. पेक्षा कमी अंतरावर असलेल्या येताळा येथील शेतकरी. महाविद्यालयीन शिक्षण घेत शेतीचा छंद व आवड त्याने प्रामाणिकपणे जपली आहे. आपल्या कुटूंबातील 7 व्यक्तींचा संसार वाघमारे कुटूंब या शेतीवर चालवतात. येथील सर्वे नंबर 505 मधील 0.80 हेक्टर जमीन चांगली कसून याच जमिनीवर प्रगती साध्य करण्याचे स्वप्न लालू याने बाळगले. वडिलांना शिक्षणाचे मोल अधिक समजलेले असल्याने त्यांनी मुलांना शिक्षणासाठीचा आग्रह धरला. या आग्रहातून शेतीतूनच त्याची बहिण पशु वैद्यकीय विषयातले पदव्युत्तर शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. इतर भावडांनी शिक्षणाचा कित्ता गीरवत शेतीशी नाळ मात्र तुटू दिली नाही. 

शिक्षणामुळे त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. कृषि विभागाशी रीतसर संपर्क केला. कृषि विभागाने त्याच्या सात/बारावर असलेली जमीन नीट अभ्यासून घेतली. या शेतीला पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्या शिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी त्याच्या शेतातील विहिरीची जागा आखून ठेवली. कृषि विभागाने सर्व कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत लालू वाघमारे याला एक सिंचन विहिर मंजूर करून दिली. 

विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी स्वत: लक्ष देऊन करून घेतले. ही योजना घेण्यापूर्वी ते फक्त खरीप पिके घेत होते. या योजनेतून त्यांना नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, विद्युत कोटेशनसाठी 10 हजार रुपये विद्युत मोटरसाठी 20 हजार रुपये असे अनुदान त्यांना मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेअंतर्गत आता शेतीसाठी समृद्धीचा मार्ग मोकळा झाला. 

महाराष्ट्र दिनी एका आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना लवकरात लवकर अशा विहिरीच्या निर्मितीचे काम लवकर कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. धर्माबाद येथील अधिकाऱ्यांनी याबाबत चाचपणी करून लालूच्या विहिरीच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी केले. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत लालू वाघमारे व परिवाराने ही विहीर शर्तीने पूर्ण करून दाखविली. 

आज 25 जून रोजी पुरेशा पाऊस झालेला नसतांनाही लालूच्या शेतातील विहिरीने आपल्या पाण्यावर पाऊसाचे ढग उतरले आहेत. या पाण्यावर फळबाग आणि भाजीपाला लागवड करण्याचा मनोदय लालू बाळगून आहे. सामाजिक न्यायाच्या प्रवाहात वंचित, अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आणता यावे यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यात कृषी क्षेत्रासह शेतीपूरक उद्योगाच्या योजना आहेत. लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार वंचित घटकातील आपल्या बांधवांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. येतळा येथील लालू संभाजी वाघमारे हे असंख्य लाभाधारकांच्यावतीने अभिव्यक्त झालेले एक प्रतीक आहे.   

या योजनेसाठी असे आहे अनुदान

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (बिरसामुंडा कृषि क्रांती योजना) (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

 पात्रता

लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर याबाबीकरीता : सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र, 7/12 व 8-अ चा उतारा, तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत), लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र. (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर),अपंग असल्यास प्रमाणपत्र,तलाठी यांचेकडील दाखला- सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) ; विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला. कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र गटविकास अधिकारी यांचे शिफारसपत्र,ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह). ग्रामसभेचा ठराव. 

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता :

सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ). जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा. तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत).ग्रामसभेची शिफारस/मंजूरी. शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह).विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र.प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे. 

-        विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड








No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...