Wednesday, May 18, 2022

 महिला पोलीस अधिकारी जेंव्हा आपल्या

महिला सहकाऱ्यांसाठी हळव्या होतात… 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या एकुण 33 लाख 61 हजार 292 च्या जवळपास आहे. यात महिलांची संख्या ही 16 लाख 31 हजार 217 एवढी आहे. या लोकसंख्येच्या सुरक्षिततेची व कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही जिल्ह्यातील 36 पोलीस स्टेशन मधील सुमारे 3 हजार कर्मचारी व काही अधिकारी समर्थपणे पेलवतात. यात महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची संख्या 1 हजाराच्या वर आहे. महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलवून महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश मिळविले आहे. एका बाजुला 33 लाख लोकसंख्येच्या सुरक्षिततेची जबाबदारी तर दुसऱ्या बाजुला आपले कर्तव्य बजावून संसारिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलवून कुटूंबालाही न्याय देणे हे तसे आव्हानच. कार्यालयीन वेळा सांभाळून, आपल्या लहान मुलांना घरी ठेऊन कर्तव्य पार पाडण्यात कधी कमतरता त्यात येऊ दिली नाही.   

नांदेड जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) पदाची जबाबदारी डॉ. अश्विनी जगताप या समर्थपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्र दिनाचे पथसंचलनही त्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणे पार पडले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आज झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीत बोलतांना त्यांनी पोलीस विभागातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक हळवा पदर उलगडून दाखविला. पोलीस अधिकारी-कर्मचारी म्हणून वेळोवेळी बजवावे लागणारे कर्तव्य आणि भावनिक गुंतागुंत यात आम्ही नेहमी समतोलपणा ठेवतो. कालचीच गोष्ट. माझी सहकारी हिला लहान मुलगा आहे. सायंकाळी तो खेळतांना पडला. त्याचा हात फॅक्चर झाला. तिने कर्तव्याला प्राधान्य देऊन नंतर मुलाच्या व कौटूंबिक जबाबदारीला स्वत:ला सिद्ध केले. माझ्या अनेक सहकारी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांना लहान मुले आहेत. यातील भावनिक गुंतागुंत बाजुला सारून आम्ही सर्व सदैव कर्तव्याला तत्पर असतो, असे सांगतांना डॉ. अश्विनी जगताप यांच्या पापण्या ओलावल्या. स्वत:ला सावरत त्यांनी आम्ही संवेदनशील असलो तरी कमजोर नाहीत हे सांगायला कमी केले नाही.

0000000 




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...