Friday, January 21, 2022

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

नांदेड जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक

 जिल्ह्याच्या विकास कामांना वाढीव निधी उपलब्ध करून घेवू

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सोळा तालुक्यांसह अनेक वैविध्य असलेल्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेद्वारे समतोल विकास साध्य करण्याचे आव्हान नांदेड जिल्ह्याने यशस्वी पैलून दाखविले. गतवर्षी नांदेड जिल्ह्याच्या मंजूर प्रारुप आराखड्यानुसार आरोग्याच्या सेवा-सुविधांसह एकात्मिक विकासाच्यादृष्टिनेही चांगले काम झाले आहे. नाविन्यपूर्ण योजनेद्वारे विकासाचे नवे स्वरूपही दिसून आले आहे. जिल्ह्यातील या उपक्रमाचे कौतूक करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला इतर जिल्ह्यांचा आढावा घेऊन वाढीव तरतूद उपलब्ध करून देऊ असे सांगितले. 

नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड येथून आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सादर केला. यात श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन, अद्ययावत कोविड-19 वार्ड, नांदेड जिल्ह्यात 14 मॉडिलर ऑपरेशन थेअटर, जिल्ह्यातील सर्व भागांना आरोग्य सुविधेशी जुळता यावे या उद्देशाने 62 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी, प्रत्येक तालुक्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एक्सरे मशीन्स, महिला रुग्णालय येथे अद्ययावत सोनोग्राफी कक्ष, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अद्ययावत कोविड अतिदक्षता बालरोग कक्ष, मिशन स्वास्थ अंतर्गत क्रीडा सुविधांवर भर, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागातून महसूल कॉलनी येथे 3 सिंथेटिक टेनिस कोर्ट, जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक 3 बॅडमिंटन कोर्ट, जिल्ह्यात शासकीय कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खुल्या जागेत ओपन जीम, नांदेड क्लब येथे हेरीटेज रोड, पाच नगरपरिषदांकरीता अत्याधुनिक अग्निशमन वाहन, नांदेड जिल्ह्यातील रुग्णालय, मनपा व नगरपरिषदांमध्ये विकेंद्रीत मलनिस्सारण केंद्राची उभारणी, नियोजन भवन येथे विविध बैठका, परिषदा यादृष्टिने व्हिडिओ कॉन्फरन्सकरीता डिजिटल एलईडी डिस्पले, सहस्त्रकुंड येथे मेगा ॲडव्हेन्चर स्पोर्ट आदी  उपलब्ध असलेल्या निधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून साध्य करुन दाखविता आली असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोना सारख्या आरोग्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सक्षम करण्यासह एकात्मिक जिल्हा विकासालाही समतोल न्याय दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतांना माहिती दिली. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी भरीव वाढीव तरतूद मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हा नियोजन विभागाने जिल्ह्यासाठी 303.52 कोटी मर्यादेत आराखडा सादर करण्याचे निर्देशीत केले होते. तथापि जिल्ह्याचा विस्तार व विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी धरला.

00000










No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...