Tuesday, November 30, 2021

 नांदेड जिल्ह्याच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाचे

लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू 

·  आजपासून निवडक पेट्रोल पंपावरही प्रायोगिक लसीकरण

·  कायदेशीर दंड व कारवाईवरही दिला जाणार भर 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात कोविड-19 प्रसार होऊ नये व संभाव्य विषाणुच्या प्रसाराबाबत ज्या काही धोक्याच्या सूचना येत आहेत त्यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी लसीकरण आणि कोविड रोखण्यासाठी निर्धारीत केलेले प्रत्येकाचे वर्तन यावर अधिक भर दिला जाईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. कोविड-19 लसीकरण, कायदेशीर दंड, संभाव्य कोरोना विषाणू आणि व्यवस्थापन याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत ते बोलत होते. 

नव्या विषाणूबाबत जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांतर्फे याचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. याचबरोबर कोरोनाच्या घातक आघातापासून रोखण्यासाठी लसीकरणावरही भर दिला जात आहे. तथापि अजूनही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसून फारसे गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचे आढळले आहे. यापुढे नागरिकांना आवाहन करण्यासमवेत आवश्यकता जिथे-जिथे भासेल त्या-त्या ठिकाणी रुपये 50 हजार रक्कमेच्या आर्थिक दंडापासून कायदेशीर कारवाई करण्यासाठी गावपातळीपासून, तालुकापातळी पर्यंत व जिल्हापातळीवरही विविध अधिकाऱ्यांना शासन निर्देशानुसार अधिकार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

शाळा सुरू होण्याबाबत प्रत्येकाच्या मनात औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे. तथापि ज्या घरातील विद्यार्थी शाळेसाठी येणार आहेत त्या घरातील प्रत्येक सदस्यांचे लसीकरण झालेले असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकांनी व संबंधित शिक्षकांनी त्या-त्या सदस्यांच्या प्रमाणपत्राची खात्री केल्याशिवाय प्रवेशाबाबत निर्णय करता कामा नये, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. दवाखान्यात प्रवेश करताना संबंधित डॉक्टरांनी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे किंवा कसे हेही तपासून घेतले पाहिजे. हे निर्णय कटू जरी वाटत असले तरी सर्वांच्या आरोग्याचे हित सामुहिक लसीकरण व मास्कसह निर्देशीत केलेली पंचसूत्री याच्या वर्तणातूनच साध्य होणार आहे. हे लक्षात घेता ज्या व्यक्तींनी अद्याप लसीकरण केलेले नाही त्यांनी पुढाकार घेऊन लसीकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

बैठकीतही झाली सर्व अधिकाऱ्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी 

या आढावा बैठकीसाठी सर्व विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वत: तपासणी करुन कायदेशीर दंडक याचा प्रत्यय दिला. ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केलेले नाही त्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2021 महिन्यांचा लसीकरण होईपर्यंत पगारही का करु नये असा त्यांनी सूचक इशारा दिला.

000000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...