Friday, June 25, 2021

जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे तात्काळ मार्गी लावा - पालकमंत्री अशोक चव्हाण

 जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे तात्काळ मार्गी लावा -         पालकमंत्री अशोक चव्हाण

           


नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील अनेक भागात सिंचनाच्या पर्याप्त सुविधा नसल्याने त्या ठिकाणी कृषी व इतर क्षेत्रासाठी शासनाने भौगोलिक रचनेनुसार शक्य त्या भागात साठवण तलावासाठी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता देवूनही अनेक प्रकल्प किरकोळ कारणांवरुन मार्गी लागले नाहीत. प्रशासकीय पातळीवर भूसंपादनापासून ज्या कांही अडचणी असतील, त्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करुन साठवण तलावाची कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभाग प्रमुखांकडून घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, महापौर मोहिनी येवणकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार आदि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.


भोकर तालुक्यातील दिवशी सिंचन तलाव, पाकी काळडोह साठवण तलाव, देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलाव, नायगांव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलाव याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. दिवशी सिंचन तलावाच्या भूसंपादनाची संयुक्त मोजणी झाली आहे. पाकी काळडोह साठवण तलावाला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलावालाही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. नायगाव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलावासाठी लागणाऱ्या 49.81 हेक्टर जमिनीचा अंतिम निवाडा जाहीर झाला आहे. यासर्व प्रकल्पांच्या पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन विभाग यांनी परस्पर समन्वयातून तात्काळ कामे मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले. याचबरोबर इतर प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला.

मुदखेड शहरातील रेल्वे क्रॉसिंगमुळे उद्भवणाऱ्या अनेक अडचणी व त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रस्तावित भुयारी मार्ग व त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. मुदखेड शहर वाढत असल्याने रेल्वेच्या दोन्ही बाजू वसलेले शहर सुरक्षित जोडण्यासाठी आता गत्यंतर राहिले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिने यावर तात्काळ मार्ग काढणे गरजेचे असून येणारे अडथळे समन्वयातून दूर करण्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक भर दिला.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...