Tuesday, June 22, 2021

 

परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा

गैरवापर केल्यास होणार कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी परवाना ऑनलाईन द्धतीने देण्यात येत आहे. या लोकभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये यासाठी या प्रणाली आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणारा अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्तीवर आवश्यक ती पोलीस कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावतीने केली जाणार आहे. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी  तसेच कोव्हिड -19 पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने देण्याची प्रणाली राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या कार्यप्रणालीद्वारे राज्यातील काही ठिकाणी अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

वास्तविक केंद्र मोटार वाहन नियम 11 अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहि केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे चिन्हांचे वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व ही माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करतांना पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्त्व पटवून दयावे तसेच प्रणालीचा गैरवापर होणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. 

नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर राज्यात जवळपास 16 हजार 920 शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे 400 नवीन वाहन नोंदणी करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे या सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थविरुद्ध पोलीस कारवाई करुन महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. या प्रणालीमध्ये नागरिकांना येणाऱ्या काही अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या द्धतीने दिसत असल्यास अथवा प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एनआयसी) दिल्ली पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...