Tuesday, June 1, 2021

 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी

प्रतिबंधात्‍मक आदेशाच्या कालावधीत वाढ  

अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधी 15 जून पर्यंत वाढविला आहे. राज्य शासनाचे 30 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्‍यात ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत हा टाळेबंदीचा कालावधी 15 जून 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत वाढवून यापुर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांसह खालील अतिरिक्‍त सूचना लागू राहतील, असे निर्देशीत केले आहे. 

 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्‍या मधील तरतुदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्‍वये प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाय योजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून जिल्हादंडाधिकारी यांना घोषित केले आहे. बुधवार 12 मे 2021 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशातील अटी व शर्ती पुढील प्रमाणे शिथील करण्‍यात आल्या आहेत.

 

यात सर्व अत्‍यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु होती ती आता सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरु ठेवता येतील. आवश्यक गटात मोडत नसलेली इतर दुकाने (केवळ एकल  दुकाने आणि मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नसलेली) दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वा. पर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार ती बंद राहतील.

 

अत्‍यावश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई- कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त किंवा घरपोच सेवा पुरवण्‍याव्‍यतिरिक्‍त येण्या-जाण्यावर दिनांक 12 मे 2021 च्‍या आदेशानुसारच निर्बंध असतील.

 

कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्‍यक राहील. (या कार्यालयामार्फत अशी परवानगी देण्‍यात आलेले विभाग राज्‍य परिवहन महामंडळ व बँका). कृषि क्षेत्राशी निगडीत सर्व दुकाने ही मा. कृषी आयुक्‍त यांचे पत्र दिनांक 27 एप्रिल 2021 मधील सूचनेनुसार संपूर्ण आठवडा सकाळी 7 ते सायं. 7 पर्यंत सुरु राहतील.

 

दुकानांना विक्रीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. त्‍याचप्रमाणे सदर माल दुकानात उतरवून घेण्‍यास वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे 2021 च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु आहेत ती या आदेशान्‍वये सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरु ठेवता येतील. निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहील.

 

या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्‍त नांदेड वाघाळा महानगरपालीका नांदेड, मुख्‍याधिकारी, सर्व नगर परीषद / नगर पंचायत यांचेवर राहील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मे रोजी निर्गमीत केले आहेत.

0000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...