Friday, May 14, 2021

 

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,

बियाणे मिनिकीट यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी गुरुवार 20 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. 

जिल्हयामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातर्गंत अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके कार्यक्रम पुढील नमूद पिकांसाठी राबविण्यात येतो. यात कडधान्य तुर, मुग, उडिद, पौष्टिक तृणधान्य ज्वारी. गळीतधान्य सोयाबीन ,तीळ. व्यापारी पिके कापुस, ऊस या पिकांचा समावेश आहे. 

बियाणे वितरणात नमूद केलेल्या कडधान्य बियाण्यासाठी 10 वर्षा आतील वाणास 50 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 25 रुपये प्रती किलो, ज्वारी सरळ वाणाचे बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 15 प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी 10 ते 15 वर्षाचे वाणास 12 रुपये प्रती किलो याप्रमाणे आहे. एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. 

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार २ हजार ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. 

बियाणे मिनिकीटसाठी सोयाबीन/ज्वारी/कापूस या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. जिल्हयामध्ये बियाणे मिनिकीटसाठी तूर , मुग , उडीद या पिकाचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे 4 किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. तूर 412 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, मुग 407 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, उडीद 349 रुपये प्रती 4 किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.

शेतकऱ्यांची निवड होणार ऑनलाईन लॉटरी पद्धतीने

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...