Monday, May 17, 2021

 

 कोरोना लसीचा दुसरा डोस 45 वर्षावरील नागरिकांसाठीच  

या प्राधान्यक्रमानेच नांदेड जिल्ह्यातील लसीकरण मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत 45 वर्षावरील नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांनाच लस देण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ज्येष्ठांना प्राधान्य देत लसीकरणाची ही मोहिम भविष्यातील डोसची उपलब्धता लक्षात घेऊन गतीने पूर्ण करु असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

 

लस ज्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्याप्रमाणात जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरवठा केला जात आहे. यात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसींचा समावेश आहे. नागरिकांची अधिकाधिक सोय व्हावी यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कटिबद्ध असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

दिनांक 18 मे रोजी होणाऱ्या लसीकरणासाठी नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण असा सर्व 91 लसीकरण केंद्रांना प्रत्येकी 100 व 50 डोसची मात्रा उपलब्ध झाल्याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. यात मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, कौठा, सिडको या 7 केंद्रावर कोविशील्डचे शंभर डोस प्रत्येकी देण्यात आले आहेत. श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना जंगमवाडी असा एकुण 3 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस प्रत्येकी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्त्री रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना शिवाजीनगर, सिडको, कौठा असा 5 केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी क्षेत्रात मोडणाऱ्या  उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, उजिरू मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी, कंधार या 14 केंद्रांवर कोविशील्डचे 100 डोस प्रत्येकी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, माहूर, नायगाव, भोकर असा एकुण 7 लसीकरण केंद्रांना प्रत्येकी 50 याप्रमाणे कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

कोविशील्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल.

0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...