Wednesday, March 24, 2021

दुय्यम निबंध कार्यालयात गर्दी करु नये

मुद्रांक जिल्हाधिकारी विजय बोराळकर यांचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- राज्य शासनाने स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहीर केली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 18 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन नांदेडचे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय प्र. बोराळकर यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने 29 ऑगस्ट, 2020 रोजी शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 डिसेबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दोन टक्के तर 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधी करीता दिड टक्केने कमी केले आहे. 31 ऑगस्ट,2020 रोजीचे शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 147 (अ) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार 28 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत शुन्य टक्का इतका तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीकरीता अर्धा टक्का इतका कमी करण्यात आला आहे. 

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असल्याने यासंधीचा लाभ घेण्यासाठी नांदेड येथील एकूण 18 दुय्यम निबंधक कार्यालयात ही सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 अ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. कोव्हिड -19 च्या प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता उपरोक्त प्रमाणे नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन नांदेडचे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय प्र. बोराळकर यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...