Monday, March 8, 2021

लेख :

तीच्या योगदानाची गोष्ट 

विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात तब्बल सोळा तालुके आणि विस्तारही तेवढाच मोठा आहे. एका बाजुला पार विदर्भ आणि तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट पासून ते थेट कर्नाटकाला भिडणाऱ्या देगलूर-मुखेड पर्यंत या जिल्ह्याने विविधता जपली आहे. या विविधतेला जपत स्वाभाविकच जिल्ह्याच्या प्रशासनाला ज्या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत त्यात आरोग्याची सुविधा खूप महत्त्वपूर्ण आहे. 

मागील वर्षभराच्या कालावधीत आव्हानात्मक ठरलेल्या कोरोनाच्या काळात हा जिल्हा डगमगला नाही. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील महिला शक्तीने तेवढीच प्रबळ झुंज देत आपली कर्तव्याची बाजू उजळून दाखविली. एकाबाजुला सर्वसामान्यांच्या मनात उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी असलेले भितीचे सावट तर दुसऱ्या बाजुला तेवढ्याच खंबिरतेने येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना बरे करण्यासाठी सरसावलेला आरोग्य विभागाचा स्टाफ, डॉक्टर्स ! कोरोना व्यतिरिक्त मानवी शरिराचे गुणधर्म लक्षात घेऊन व्यक्तीपरत्वे असलेले विविध आजार व त्यासाठी आवश्यक उपचार वेळीच होणे हे तसे पाहिले तर दुसरा पूर्नजन्मच ! 

अशा या आव्हानात्मक काळात शासनाच्या आरोग्य विभागातील टीम खंबीरपणे पुढे येऊन स्वत:ला झोकुन देत जेंव्हा काम करते तेंव्हा तसे पाहिले तर सर्व आव्हानांवर एक विश्वासक मार्ग दिसून येतो. अशा या आरोग्य विभागाच्या टीममधील महिलांचे योगदान ठळक अक्षरात नोंदवून ठेवावे लागेल. 

कोरोना संसर्गामुळे इतर आजार दूर झाले असे वरकरणी कदाचित कोणी म्हणू शकेल. मात्र कोरोनाचे आव्हानही कमी झाले नाही आणि इतर आजारांपासूनही मानवला सुटका मिळालेली नाही. आजाराच्या लक्षणाप्रमाणे त्यावर तातडीने इलाज करणे हाच त्यातून मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. इतर आजारांसमवेत डोळ्यांचे आजार हे अधिक नाजूक आणि आव्हानात्मक असतात. याकडे अधिक दुर्लक्ष झाले तर कायम अधुपणाची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोना व्यतिरिक्त इतर सेवा-सुविधासमवेत नेत्रविकार आणि विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रियावरही तेवढाच भर दिला. 

नांदेड जिल्ह्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मिशनची कोरोनाच्या काळात कमान संभाळली ती एका महिलेने. डॉक्टर रोशन आराखान तडवी आणि त्यांच्यासमवेत झटणाऱ्या साऱ्याजणी जेंव्हा मागील वर्षेभरातल्या आठवणी सांगत होत्या. या वर्षभराच्या विविध आव्हानात खंबीर साथ देऊन इतर सेवा-सुविधा पुरविणारा त्यांची स्टाफ नर्सपासून ते सफाई कामगारापर्यंतची शक्ती ही अर्थात महिलांचीच ! 

आरोग्य विभागामार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानांतर्गत कोरोनाच्या आव्हानावर मात करत दृष्टी गमविण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सुमारे अकराशे (1100) वृद्ध महिला-पुरुषांचे ऑपरेशन डॉक्टर रोशन आराखान आणि आरोग्य विभागाच्या टीमने यशस्वी पूर्ण करून शासनाच्या वैद्यकिय सेवा क्षेत्राला उजळून टाकले.

माणुस म्हणल्यावर भीती कोणाला नसते ? एकवेळ पुरुषांना घरातला वावर बाहेरून आल्यावर कमी करता येऊ शकेल मात्र महिलांना स्वयपाक घरापासून सर्वच कोपऱ्यात गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. एकीकडे कर्तव्य म्हणून, आपल्या पेशाचे उत्तरदायित्व म्हणून, जबाबदारीचे भान म्हणून आणि त्याही पलिकडे माणूस म्हणून जे वैद्यकिय सेवेचे व्रत आहे ते जपल्याशिवाय समाधान नाही अशी साधी आणि सरळ संवेदना जागे करणारी उकल डॉक्टर रोशन आराखान तडवी यांनी करून देत या एक हजार शस्त्रक्रिया मागचे बळ उकलून दाखविले. 

मागील मार्च पासून ते ऑगस्ट पर्यंतचा काळ एका भयाच्या सावटा खालचा म्हणता येईल. हे सावट अजूनही संपलेले नाही. कोरोना अजून गेलेला नाही. तो जीवघेणाच आहे. मात्र असे असले तरी त्याच्यापासून स्वत:चे संरक्षण कसे करायचे याची त्रिसुत्री मात्र प्रत्येकाच्या जवळ आहे. ही त्रिसुत्री अर्थात जबाबदारी, मी जबाबदार म्हणून प्रत्येकाने स्विकारली पाहिजे. साधे गणित आहे हात वेळोवेळी स्वच्छ धुणे, मास्कचा सतत वापर करणे आणि इतर व्यक्तीपासून थोडे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकिय क्षेत्राच्या बाहेर असलेल्या व्यक्तींनी एवढी खबरदारी घेतलीच पाहिजे, असे कोरोना वार्डात काम करणारी स्टाफ नर्स संतोषी रतनसिंग मंगोत्रा सांगत धीर देवून जाते.

वैद्यकिय क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींना स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच दवाखाण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेणे हे आलेच. इतरांसाठी जी त्रिसुत्री आहे ती इथे पाळण्यासमवेत वेळप्रसंगी एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याच्याजवळ जाऊन त्याला धीर देणे, उपचार करणे क्रमप्राप्त आहे. अशावेळेस आहे ती सर्व खबरदारी व शासनाने दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करुन बळ एकटवणे तसे पाहिले तर सोपे नाही. परंतू कर्तव्याची भावना हिंमत देते. ही हिंमत कदाचित महिलांमध्ये आई म्हणून, बहिण म्हणून अधिक ठेवावी लागेल, असे आयुर्वेदिक कॉलेजच्या नेत्रविभाग प्रमुख डॉक्टर कल्पना वाकोडे सांगतात. 

आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दोन पातळ्यांवर दक्ष असावे लागते. एक पातळी म्हणजे कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद व दुसरा भाग म्हणजे एक गृहिणी म्हणून सांभाळावयाची घरची जबाबदारी. गेले वर्षभर मला कोरोना वार्डात समुपदेशनाचे काम करावे लागले. एका बाजुला पेशंटला न भेटता येणारे त्यांचे जवळचे नातलग तर दुसऱ्या बाजुला दवाखाण्यात ॲडमिट असलेल्या रुग्णाच्या मनात जे काही वादळ सुरू असते त्याला शांत करुन धीर देणे आणि त्याचा आत्मविश्वास वाढविणे. कोरोनाच्या या काळातील या दोघांमध्ये असलेला दुवा म्हणून काम करतांना स्वत:लाही एक माणूस म्हणून खूप वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. हे शब्द आहेत कोरोना बाधित रुग्णांवर समुपदेशनाचे काम करणाऱ्या ज्योती पिंपळे हिचे.

घरी असलेल्या छोट्या बाळाची काळजी घेत घर सोडतांना घरच्या भावना या घरी सोडायच्या आणि दवाखाण्यात आल्यावर हेच आपले घर समजून आपल्या कर्तव्यावर एकाग्रता साधायची हे सूत्र ज्योती सांगून जाते. ही दुहेरी जबाबदारी कदाचित महिला म्हणूनच पार पाडता आली की काय असा सवाल उपस्थित करुन ज्योती पिंपळे नकळत आरोग्य विभागातील महिला ज्या काही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत त्याकडे लक्ष वेधून घेते.

डॉक्टर मसरत सिद्दीकी ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या टिममधील एक सहकारी आहेत. कोरोनाच्या काळात तिच्या स्वत:च्या घरावर संकटे येऊन गेली. जवळच्या आप्तेष्टांना काळाने तिच्यापासून ओढून नेले. घर भयावह झालेले असतांना ही हिंमत घेऊन आपले कर्तव्य बजवायला पुढे सरसावली. या संपूर्ण वर्षेभराच्या काळात एक व्रत घेऊन ती आरोग्याच्या सेवा सामान्यांपर्यंत विश्वासाने पोहचाव्यात यासाठी काळजी घेत आहेत. आमचे तसे पाहिले तर कामच आहे. घरावर आलेल्या आव्हानाचा विचार करता मी जर भिऊन घरीच थांबले असते तर माझे मी स्वत:ला कधीच माफ केले नसते. घरी कोरोनाने आप्तेष्ट गमावूनही मला माझ्या आईने धीर दिला. बाहेर पडायला बळ दिले म्हणून मी या लढाईत आरोग्य विभागाच्या टिमची एक सदस्य म्हणून लढू शकले हे अभिमानाने सांगायला डॉ. मसरत कमी करीत नाहीत.

काळ सर्वांना खूप काही शिकवतो. काळाने दिलेला धडा मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिलच याची शाश्वती देता येत नाही. प्रत्येक रुग्णालयात अशा डॉ. मसरत, डॉ. कल्पना, डॉ. रोशनी, नर्स नंदा, ज्योती, विशाखा, संतोषी अशा कित्येक धैर्यवान महिला आहेत. त्यांच्या योगदानाला आधोरेखीत करणारा हा काळ आहे.

आपण नागरिक म्हणून नेमके कुठे आहोत हा खरा प्रश्न आहे. एका बाजुला स्वत:चे घरदार विसरून प्रत्येक रुग्णालयात झुंजणारी आरोग्य विभागाची टिम तर दुसऱ्या बाजुला कोपऱ्या-कोपऱ्यावर, सार्वजनिक ठिकाणी आवश्यकता नसतांना गर्दी करून धोके वाढवणारे आपण आहोत का ? आरोग्याची त्रिसुत्री न पाळणारे आपण आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाने विचारून काळजी घेतली तर सर्वांचेच जगणे सुसह्य होईल. आरोग्य सेवेत दिवसाची रात्र करुन सेवा देणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रातील सर्व स्टाफला, महिला शक्तीला आपण काळजी घेऊन आश्वस्त करु यात. 

- विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

0000000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...