Monday, February 22, 2021

माझी जबाबदारी भक्कम पार पाडण्यासाठी 

नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी  

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाय योजना हाती घेतल्या असून आता नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन जे प्रवाशी नांदेड जिल्ह्यात येत आहेत त्यांची या छावणीत अँटिजेन कोरोना चाचणी केली जाईल. जे बाधित आढळतील त्यांना उपचारासाठी ते जेथून आले आहेत तिथे पाठविण्यात येईल व ज्यांचे अहवाल बाधित आले नाहीत त्यांना प्रवेश दिला जाईल. बाधितांवर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल याउद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या छावणीद्वारे यवतमाळ येथून येणाऱ्या प्रवाशांचे वेळप्रसंगी समुपदेशनही छावणीच्या पथकातील सदस्य करतील. कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकिय पथक याठिकाणी काही दिवस ठेवू असे  ते म्हणाले. 

माझे कुटूंब माझी जबाबदारी समवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मी जबाबदार या कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधून नांदेड जिल्हावासियांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जनतेने प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट करुन नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.  

0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...