Friday, January 29, 2021

 

वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेकटर लावणे आवश्यक

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कपडा बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. साखर कारखान्यांना ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येथे 28 जानेवारीला संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.    

जिल्ह्यात रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने  "32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021" हे 18 जानेवारी  ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, महामार्ग पोलीस निरीक्षक अब्दुल रहेमान, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर व बारड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक नांदगावकर आदी यावेळी उपस्थिती होती. 

याप्रसंगी कारखान्याच्या परिसरातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर लावण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य लिपीक राजेश गाजूलवाड, शेतकी अधिकारी श्री. गाडेगावकर यांनी परिश्रम घेतले.

0000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...