Monday, September 7, 2020

 

कोरोनावरील उपचार आणि विलगीकरणासाठी खाटा वाढवणार !

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय व खासगी अशा दोन्ही क्षेत्रात उपचार आणि विलगीकरणासाठी खाटांची संख्या वाढवली जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात सोमवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. रविवारी रात्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

आपल्या संबोधनात पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात रोज साधारणतः 250-300 रूग्ण आढळून येत आहेत. समाधानाची बाब म्हणजे तेवढेच रूग्ण रोज बरे होऊन घरी जातात. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर देखील कमी झाला आहे. असे असले तरी परिस्थिती काळजी करण्यासारखीच आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच उपचार आणि विलगीकरणासाठी उपलब्ध सुविधांमध्ये वाढ केली जाणार आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधांसोबतच निधी व मनुष्यबळाची उपलब्धता महत्वाची आहे. जिल्ह्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. पैशाविना कोणतेही काम अडणार नाही, याची खबरदारी घेतली जाते आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्ही बाबी एकाचवेळी सांभाळण्याचे मोठे आव्हान समोर आहे. आर्थिक व्यवहार नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवून कोरोना रोखणे, हाच एकमेव पर्याय आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकमेकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विषद केली. 

डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस व इतर विभागांचे कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. त्यांना सुट्टी नाही, पुरेशी विश्रांती नाही. तरीही ते उसंत न घेता रूग्णसेवेत व्यस्त आहेत. कोरोना रोखण्यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळावेत आणि अनावश्यक गर्दी टाळून या कोरोनायोद्ध्यांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीतील महत्वाचे निर्णय

·         नांदेड जिल्‍ह्यातील शासकीय रूग्णालयात खाटांची संख्या वाढवणार.

·         नांदेडमधील 9 खासगी रूग्णालयांमध्ये 10 टक्के खाटा वाढवणार.

·         50 खाटांची क्षमता असलेल्या दोन खासगी रूग्णालयांना कोविड-19 उपचार केंद्र करण्याची बोलणी सुरू.

·         डॉ. शंकरराव चव्‍हाण वैद्यकिय महाविद्यालयात 10 सप्टेंबरपर्यंत ऑक्‍सीजनसह अतिरिक्त 80 खाटांचे नियोजन करणार.

·         गुरुगोविंदसिंघ जिल्‍हा रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीत ऑक्‍सीजनसह 150 खाटा एका आठवड्यात उपलब्ध करणार.

·         शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,नांदेड येथे 30 सप्टेंबरपर्यंत ऑक्‍सीजनसह 100 खाटा व विनाऑक्‍सीजन 50 खाटा उपलब्‍ध होणार.

·         अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील ट्रॉमा हॉस्पिटलला 30 खाटांच्या ऑक्‍सीजन सुविधेसह कोविड-19 सेंटर म्‍हणून कार्यान्‍वीत करणार.

·         जिल्ह्यातील ऑक्सिजन साठा व पुरवठ्यासंदर्भात दैनंदिन आढावा घेणार.

·         कोरोना रूग्णांसाठी खाटा उपलब्‍ध होत नसल्‍याच्या तक्रारी येत असल्याने खाटा व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष उभारणार.

·         रूग्‍णांच्‍या स्थितीची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी व्‍हीडीओ कॉलिंग सुविधा सुरू करणार.

·         खाजगी रुग्‍णालयात जादा बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करणार.

या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी,  महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ.शंकरराव चव्‍हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मोरे, शासकीय आयुर्वैद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...