Tuesday, September 1, 2020

 

 दहावी नंतर शासकीय सुविधांचा लाभ घेत पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा

- प्राचार्य डॉ जी. व्हि. गर्जे

 

·         प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी बंधनकारक 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- येत्या पाच वर्षात राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित. त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, डी.एम.एल.टी इत्यादी निवडून उज्वल भविष्याची सुरुवात करावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे. 

टाळेबंदीच्या काळात सुद्धा एच.सी.एल टेक्नॉलॉजी, आय.एस.टी.सी, बजाज प्रा.ली., एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी, टाटा इंजिनीरिंग, जॉन डिअर, लोकेश मशीन, व्हेरॉक इंजिनीअरिंग, अदाणी इलेक्ट्रिकल्स, फोर्ब्स मार्शल, महिंद्रा अँड महिंद्रा, सुरोज बिल्डकॉम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, व्हर्लपूल, अश्या अनेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मागणी होते आहे. ह्या कंपन्या विद्यार्थ्यांना ऑन-रोल देखील घेण्यास तयार आहेत.  

पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो तोही कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय. दहावी नंतर आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रात कनिष्ठ पातळीवर कामासाठी निवडला जाईल. तर पॉलिटेक्निक पदविका प्राप्त विद्यार्थी सुपरवायझरी लेव्हलवर निवडले जातात. त्यामुळे आय.टी.आय. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. 

यातच मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अनेक शासकीय योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश मिळतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा  विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा घेता येतो. खुल्या प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत निवास व भोजनासाठी शिष्यवृत्ती मिळते. तसेच वार्षिक 6 लक्ष उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ बी सी सवलतीचा फायदा मिळतो. व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी, निवास व भोजनासाठी दरवर्षी आर्थिक मदत शासनातर्फे मिळते.  अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम, जैन, बौद्ध, पारशी, शीख आदी विद्यार्थ्यांना अधिकतम 25 हजार रुपये पर्यंतचे शिक्षण शुल्क माफ केले जाते. या शिवाय आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या होतकरु, हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे ट्युशन फीस वेवर स्कीम अंतर्गत प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण शुल्क शासनातर्फे दिले जाते. ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाचे अट असते. 

या सर्व आर्थिक सोई-सुविधांचा लाभ घेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन करणे किंवा घरुनच आपल्या मोबाईलवरुन करणे बंधनकारक आहे. कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तांत्रिक शिक्षणाचा वाटा मोठा आहे त्यामुळे इतर पारंपारिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निकच्या तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल. त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेची निवड करत उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिले पाऊल टाकावे असे आवाहन प्राचार्य, डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...