Thursday, July 30, 2020


वृत्त क्र. 705  
कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या
शेतमजुरांसाठी महत्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम
नांदेड (जिमाका) दि. 30 :- ग्रामीण भागातील शेतमजुरांचे कौशल्य वाढविण्याच्यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, कृषि क्षेत्रात काम करतांना सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, शेतीपूरक कार्यक्षम व्यवसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. शेतीतील उत्पादन गुणवत्तापूर्ण घेण्याच्यादृष्टिने प्रशिक्षण घेतलेले शेतमजूर शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सहाय्यभूत ठरतील. या शेतमजूरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आदी कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होवून शेतकऱ्यांनासुध्दा मोठा फायदा होणार आहे.
सद्यस्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार आहे. ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.
या प्रशिक्षणाबाबत संबंधीत जिल्ह्यातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधुन ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अवाहन संचालक आत्मा कृषि आयुक्तालय पुणे यांनी केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...