Saturday, June 20, 2020


वृत्त क्र. 558   
नांदेड जिल्हा प्रशासनाचा
अखिल भारतीय पातळीवरील पुरस्काराने गौरव
कर्करोग नियंत्रण जनजागृतीसाठी राबविली होती अभिनव मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कर्करोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासंदर्भात राबविलेल्या मोहिमेला अखिल भारतीय पातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला आहे. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही मोहिम यशस्वी करणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
कर्करोग आजारासंदर्भात लोकांनी निसंकोचपणे आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बाराशे खेड्यांमध्ये 1 हजार 500 आशा कार्यकर्ती यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. याचबरोबर रॅली व इतर उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास 25 लाख लोकांना स्क्रीनिंगच्या कार्यकक्षेत घेता आले. यात सुमारे 12 हजार लोकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने त्यांना वेळेवरच योग्य उपचारासाठी पाठविण्यात आले. वेळीच त्यांना उपचार मिळाल्याने पुढील संभाव्य आजाराच्या संकटापासून त्यांना वाचविता आले. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ही मोहिम राबविली गेली.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण जिल्हाभर राबविल्या गेलेल्या या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर गुड गव्हर्नन्ससाठी मान्यता प्राप्त असलेल्या स्कोच अर्वाडसाठी नामांकन दाखल केले होते. यानंतर सदर संस्थेने अखिल भारतीय पातळीवरील नवीन दिल्ली येथे या वर्षाच्या जानेवारी महिन्यात एक मोठी परिषद घेऊन प्रत्येक नामांकन सादर करणाऱ्या जिल्हा प्रमुखांना सादरीकरण करण्यास सांगितले होते.  यात नांदेड जिल्ह्याचे सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी करुन संपूर्ण जिल्ह्याचा सप्रमाण आराखडा ठेवला होता. नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या माहितीने सारे सभागृह भारावून गेले होते. निवड समितीनेही याची चांगली दखल घेत नांदेड जिल्ह्याला अखिल भारतीय पातळीवरील हा डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अशोक काकडे, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, बार्षी येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार पानसे, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व जिल्हा परिषदेतील संबंधीत यंत्रणेने यासाठी पुढाकार घेतला.
0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...