Monday, June 22, 2020


दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून
जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !
नांदेड (जिमाका) दि. 22 :- सर्व जिल्ह्यांसाठी कोरोनाचे संकट हे अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. नांदेड जिल्हा प्रशासन याला अपवाद कसे असणार. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कोविड 19 संदर्भातील दक्ष प्रशासन कौशल्याला भारावून नांदेडच्या बळीरामपूर येथील दिव्यांग सिद्धार्थ याला समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा गौरव करावा वाटला. आपल्याजवळ जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विशेष काही नाही याचे मनात कुठलेही शल्य न बाळगता त्याने डॉ. विपीन यांचे एक स्केच रेखाटले. या स्केचला घेऊन तो आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. ऐंशी टक्के दिव्यांग असल्याकारणाने त्याला जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहचणे शक्य नव्हते.
आपल्याला भेटायला एक दिव्यांग आला आहे आणि तो प्रवेशद्वाराजवळ असल्याचा निरोप जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना जेंव्हा कळाला तेंव्हा ते कॅबीन सोडून त्याला भेटायला प्रवेशद्वाराजवळ पोहचले. त्याने काढलेल्या स्केचचा नम्रतेने स्विकार करत आस्थेने विचारपूस केली. साहेब तुम्ही कोविड 19 च्या या काळात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जी काळजी घेत आहात, गोरगरिबांच्या रोजगाराला आता अधिक बाधा पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहात त्याबद्दल समाजाचा घटक म्हणून मला तुमची भेट घेऊन धन्यवाद दयावे वाटले असा कृतज्ञता भाव सिद्धार्थने व्यक्त केला. या अनौपचारिक भेटीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर भारावून गेले.  
जनतेच्या हिताची योग्य ती दक्षता घेणे, सर्वसामान्यांचे प्रतिबिंब प्रशासनात बिंबवणे, शासनाच्या उपक्रमात लोकांचा सहभाग अधिक चांगला असणे हे सशक्त समाजाचे लक्षण आहे. या कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात नांदेडकर आपली नागरिक म्हणून असलेली जबाबदारी चांगली निभावत आहेत. सिद्धार्थ याच्या भावना याच नम्रतेने मी स्विकारत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.   
सिद्धार्थ शेषेराव जमदाडे हा बळिरामपूर येथे छोटे किराणा दुकान चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्यापरिने व समाजातील काही लोकांना घेऊन गरजूंना मोफत अन्नधान्याच्या किट वितरीत केले. दिव्यांगाच्या प्रहार संघटनेमार्फतही त्याने प्रशासनाला केलेल्या सहाकार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.     
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...