Tuesday, June 2, 2020

विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ



नांदेड (जिमाका) दि. 2 :-  भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी शनिवार 6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली अंतर्गत www.mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या / महाविद्यालयाच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येते.
महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर छानणी करुन आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगीनमधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर फॉरवर्ड करण्यात यावे.
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रियेसाठी बुधवार 10 जून 2020 पूर्वी सादर करावेत.
कॉलेज लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शनिवार 6 जून 2020 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड न केल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस मावळदकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...