Tuesday, May 12, 2020


नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 53 रुग्ण पॉझिटिव्ह ;
बारड येथे कोरोनाचा एक नवीन रुग्ण ;
आरोग्य सेतू ॲपची 1 लाख 64 हजार 455 लोकांनी केली नोंदणी
नांदेड, (जिमाका) दि. 12 :- कोरोना विषाणू संदर्भात मंगळवार 12 मे रोजी प्राप्त 24 अहवालानुसार मुदखेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथील एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 23 अहवाल हे  निगेटिव्ह प्राप्त झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत एकुण 53 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज 12 मे पर्यंत आरोग्य सेतू या ॲपच 1 लाख 64 हजार 455 लोकांनी नोंदणी केली असून या ॲपचा फायदा  कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी होत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळते, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
मंगळवार 12 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार  नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 698 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 2 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 730 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 188 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण 53 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या 53 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 12 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड, व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...