Wednesday, April 22, 2020


साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे,
स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून
कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रांतर्गत
सर्व कापूस खरेदी केंद्रास परवानगी
नांदेड दि. 22 :- जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने 15 एप्रिल रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कृषि शेतमालाची खरेदी-विक्री व कृषि शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव (पणन)  यांनी 17 एप्रिल रोजी भारतीय कापूस निगम (CCI) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनाने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार असून लघुसंदेशामध्ये नमूद दिनांकास शेतकऱ्यांने सात-बारावरील पीकपेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे.
एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. Non FAQ दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक  पुणे यांनी तालुकास्तरावर तालुका उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी  व बाजार समितीचा सचिव यांनी समिती गठीत केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर साथसोवळे सामाजिक अंतर (Social distance) व स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आवाहन, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...