Friday, January 31, 2020


करोना व्हायरस: रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या
डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन
आरोग्यमंत्र्यांकडून पुणे येथे आढावा
मुंबई, दि. 31 : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल  केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने आज राज्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीचा चाचणीसाठी पाठविलेला नमुना जर निगेटीव्ह आला तर त्याला डिस्चार्ज देऊन 14 दिवसापर्यंत पाठपुरावा करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात दाखल व्यक्तींना घरी सोडले जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान , राज्यात नव्याने तीन जणांना प्रतिबंधात्मक उपायांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या 12 जण निरीक्षणाखाली आहेत. संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२० - २६१२७३९४ असा आहे.
दरम्यान, चीनच्या ऊवान प्रांतातून भारतातील प्रवाशांना घेऊन येणारे विमान आज  किंवा उद्या दिल्ली येथे दाखल होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 26 प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती केंद्र शासनाने आज महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला कळविली आहे. या 26 प्रवाशांना  दिल्ली येथे उतरून तेथेच त्यांची तपासणी आणि विलगीकरण कक्षामध्ये दाखल केल्यानंतर 14 दिवसांनंतर ते महाराष्ट्रात परततील, असे केंद्र शासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे भेट देऊन करोना विषयक प्रतिबंध व नियंत्रण विषयक उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना करोना संदर्भात विभाग करत असलेल्या विविध बाबींची माहिती दिली. 
सध्या कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि नायडू रुग्णालय, पुणे येथे प्रत्येकी ५ जण भरती आहेत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथे प्रत्येकी १ जण भरती आहे. त्यापैकी ९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याबाबतचे अहवाल एन आय व्ही पुणे यांनी कळविले आहे तर इतर ३ जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून आतापर्यंत ५१२८ इतके प्रवासी तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी ४ प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात राज्यात आणखी ३२ प्रवासी असे एकूण ३६ प्रवासी आढळले आहेत. सर्व प्रवाशांचा त्यांच्या आरोग्य स्थितीबाबत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करण्यात आला आहे. 
करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि आरोग्य शिक्षण विषयक साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...