Wednesday, May 15, 2019


संभाव्य आपत्ती काळात यंत्रणांनी
समन्वय, सतर्कता, तत्परतेने प्रयत्न करावेत
-          जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 15 :- आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
मान्सून 2019 च्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांचेसह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, कृषि आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, पाझर तलाव, नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. महानगरपालिका, नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करावयाची आवश्यकता भासल्यास जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रफळाचे अक्षांश, रेखांश आणि स्थायी व अस्थायी आपत्तकालीन हेलीपॅडची माहिती स्थानिक पातळीवरुन तहसिलदारांना 25 मे पूर्वी पाठवावी. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदी पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व खात्यात समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  तहसीलस्तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी पूर्ण करावीत आणि स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चालू मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. जिल्ह्यात 80 मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावे. शासन निर्णयाप्रमाणे आपतग्रस्तांना योग्य मदत झाली पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
नांदेड जिल्ह्याचे एकुण वार्षिक सरासरी पर्जन्यमान 955.55 मि.मी. एवढे असून मागील पाच वर्षात सन 2014 मध्ये 45 टक्के, सन 2015 - 48 टक्के, सन 2016 - 113 टक्के, सन 2017 - 67 टक्के, सन 2018 मध्ये 81 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या प्रमुख नद्या असून तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या नांदेड-46, अर्धापूर-9, मुदखेड- 10, लोहा-9, कंधार-17, किनवट-31, माहूर-7, हिमायतनगर-16, भोकर-14, हदगाव-23, उमरी-17, देगलूर-27, मुखेड-36, बिलोली-18, नायगाव-39, धर्माबाद-18 अशी एकुण 337 गावे आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.   
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...