Wednesday, January 2, 2019


दरेसरसम साठवण तलावाचे घळभरणी कामात
शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण करु नये
जलसंपदा विभागाचे आवाहन  
नांदेड, दि. 2 :- दरेसरसम साठवण तलावाचे घळभरणीचे धरणामध्ये पाणीसाठा निर्माण करण्याचे काम प्रगत असतांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामात अडथळा निर्माण करु नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा मावेजा वाढीव रक्कमेसह वाटप करण्यात आला असून संपादीत जमिनीची खरेदी खाजगी वाटाघाटीने सन 2011 मध्ये पूर्ण झाली आहे. संपादीत जमिनीचा सातबारा शासनाच्या नावे असून शेतकऱ्यांचा त्या क्षेत्रावर कुठलाही अधिकार नाही. तसेच चालू दराने जमिनीचे दर मागणे पूर्णत: नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. कारण या जमिनीची खरेदी शासनाने 2011 मध्ये केली आहे. उर्वरीत जमिनीची सांडवा व पूच्छ कालवा तसेच संरक्षक बांधासाठी आवश्यक अतिरिक्त जमिनीचे संपादन 11.54 हेक्टर सद्य:स्थितीत प्रगत असून त्यासाठी चालू दराने खरेदी करणे चालू आहे. हे दर यापुर्वी खरेदी केलेल्या सन 2011 मधील जमिनीस लागू करणे नियमबाह्य आहे. याबाबत कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांनी शेतकऱ्यांची मागणी अमान्य केली असून प्रकल्पाचे काम त्वरीत चालू करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामामध्ये कोणी अडथळा निर्माण केल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे किनवट येथील मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. 2 चे उपविभागीय अभियंता अ. कि. कलवले यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...