Wednesday, January 30, 2019


मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
वीज जोडणीसाठी राज्यात 8 हजार 685 तर जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांचे अर्ज

नांदेड, दि. 30 :- राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च 2019 अखेरपर्यंत 50 हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी राज्यात 8 हजार 685 तर नांदेड जिल्ह्यात 365 शेतकऱ्यांचे  अर्ज प्राप्त झाले आहेत.  या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
 शाश्‍वत जलस्त्रोत  उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत 29 जानेवारी 2019 पर्यन्त राज्यातील सुमारे 8 हजार 685 तर जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात 5 हजार 446 शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. अर्ज हा सरळ व सोपा असून कमीतकमी कागदपत्रांची जसे सातबारा व आधारकार्डची प्रत मागणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरीता, राज्यातील कृषी वापरासाठी पारेषण विरहित एक लाख कृषीपंप उपलब्ध करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. तसेच यापुढे सिंचनाकरीता वीजेचे बील भरण्याची सुद्धा गरज राहणार नाही. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड महावितरण अधिक्षक अभियंता यांचेद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सौर कृषीपंपाच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांचा 5 टक्के हिस्सा राहिल. या योजनेत सौर ऊर्जा संचासमावेत लाभार्थ्यांना डी.सी. विद्युत मोटरपंप संच व कंट्रोल पॅनल सुद्धा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दोन एलईडी, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 5 टक्के लाभार्थी हिस्स्या व्यतिरिक्त लागणार हिस्सा हा अनुक्रमे सामाजिक न्याय विभागाने व आदिवासी उपविभागाने उपलब्ध करुन दयावयाचा आहे. अशी तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शासनाच्या विविध योजनेत ज्यांना विहिर, कुपनलिका, शेततळे आदींचा लाभ देण्यात आला आहे, असे शेतकरी सुद्धा पात्र असतील. पाच एकरापर्यंत 3 एचपी सौरपंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीनधारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचे डीसी सौर ऊर्जापंप देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने वीज जोडणी नसणे आवश्यक आहे, असे महावितरणने कळविले आहे.
0000000

No comments:

Post a Comment