Tuesday, November 6, 2018


लोहा नगरपरिषद निवडणूक काळात
आयोगाच्या सूचनांचे पालन करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
            नांदेड, दि. 6 :- लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशाचे सर्वतोपरी पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
            लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 च्या संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात काल (दि. 5) घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  
            बैठकीस उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सरवदे, सा.बां. उपविभागीय अभियंता जी. व्ही. गुरले, अग्रणी बँक व्यवस्थापक अमोल चव्हाण, सहायक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहाय्यक राज्यकर आयुक्त प्रकाश गोपनर, नगरपरिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, लोहा नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. डोईफोडे, संनियंत्रण समिती सदस्य उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, ही निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्यावेळी जी दक्षता घेण्यात येते ती घेण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आचारसंहिता कालाधीत मतदारांना प्रभावित तसेच प्रलोभन देण्यासाठी उमेदवारांकडून तसेच राजकीय पक्षांकडून नवनवीन कल्पना वापरण्यात येतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जसे वस्तू, मद्य व पैसा इत्यादीच्या वाटपांवर अंकुश ठेवावा. उमेदवार व राजकीय पक्षांनी खर्चाबाबत व्यवस्थित माहिती वेळेवर सादर करावी. रोख रक्कमा मोठ्या व्यवहाराबाबत संबंधित विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, फार्म हाऊस, तारण वित्तीय हवाला दलाल, बँकामार्फत मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे, असेही निर्देश समिती सदस्यांना देण्यात आले.
            आयोगाच्या आदेशाचे पालन व व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सुचना देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाकडील 1 नोव्हेंबरच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात लोहा नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदाचा व सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर मतदानाची मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता 1 नोव्हेंबर पासून लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अंमलात राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...