Monday, September 3, 2018


लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ
स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन
सकारात्मक असावा - अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 3 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थी, युवक-युवतीनी या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवावा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नरहर कुरुंदकर सभागृहात लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी नांदेड एज्यूकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष श्यामला पत्की यांची तर प्रमुख वक्ते म्हणून नांदेड येथील परीवीक्षाधीन पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल यांची उपस्थिती होती. यावेळी पिपल्सचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. 
स्पर्धा परीक्षेसाठी करावयाच्या तयारी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्नांची गरज आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थ्यांची जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगली तर स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळू शकते. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची पद्धती समजावून घेऊन नियोजन करुन अभ्यास केल्यास आणि अभ्यासात कायम सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक साहित्याचे वाचन महत्वाचे असून संदर्भग्रंथ आणि वृत्तपत्र वाचनाची सवय लावली पाहिजे. राज्य आणि देशात घडणाऱ्या घटनांचा वेध आपल्या वाचनात घेतला पाहिजे, असे सांगतांना त्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाची माहिती देवून दर महिन्यांच्या 5 तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
लोकराज्य मासिकाच्या वैविध्यपूर्ण अंकाविषयी बोलतांना पाटील म्हणाले की, देशातील सर्वाधिक खपाच्या शासकीय नियतकालिकाचा विक्रम करणाऱ्या लोकराज्य वाचकवर्ग वाढत असून स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शक ठरत आहे. लोकराज्यचा मोठ्या संख्येने वर्गणीदार होवून युवकांनी स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग खुला करुन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नांदेड येथील पोलीस दलात परीवीक्षाधीन पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झालेले आयपीएस अधिकारी संदीपसिंग गिल यांनी यावेळी विशेषत: युपीएससी परीक्षेतील यश मिळविण्यासाठी आपल्या स्वानुभावावर आधारित मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी, बँक प्रोबेशनरी ऑफिसर यासारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरीता युवक-युवतींनी अभ्यासाचे काटेकोर नियोजन करणे महत्वाचे आहे. वेळेचे नियोजन, वृत्तपत्र मासिकांचे वाचन, सातत्य, चालू घडामोडीची माहिती, अंकगणित व बुद्धीमत्ता चाचण्यांची तयारी करण्याबरोबरच परीक्षा पद्धतीचाही बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. आयुष्यात प्रथम आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असून ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनापासून सर्वतोपरी तयारी करणे गरजेचे आहे. नवनवीन ज्ञानाची भर घालत स्पर्धा परीक्षेचा सातत्याने सराव करण्याची आवश्यकता आहे, असेही संदीपसिंग गिल यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी युवक-युवतींशी दुहेरी संवाद साधला.
नांदेड एज्यूकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती श्यामला पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनापासून तयारी करण्याची गरज अधोरेखित केली. अपयशाला न खचून जाता सातत्याने परीश्रमपूर्वक प्रयत्न केले तर यश हमखास आहे. इच्छा तेथे मार्ग या संकल्पनेचा आपल्या आयुष्यात अवलंब केला तर यशस्वी होण्याची खात्री आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी पाहूण्यांचे पुष्पगुच्छ व  लोकराज्यचा अंक देवून स्वागत केले आणि प्रास्ताविकात लोकराज्य वाचक अभियानाविषयी माहिती दिली. लोकराज्य मासिकाचा प्रचार, प्रसार करण्याच्या हेतूने व लोकराज्यचे महत्व जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान असल्याचे सांगत त्यांनी लोकराज्यच्या संदर्भमुल्य असलेल्या  विविध विशेषांक आणि इतिहासाची माहिती यावेळी दिली. यावेळी प्राचार्य जाधव यांनीही पाहुण्यांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत केले. यावेळी लोकराज्यचे नियमित वाचक असलेल्या मुंजाजी चव्हाण या विद्यार्थ्यांने लोकराज्यची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कल्पना जाधव यांनी केले तर शेवटी विजय होकर्णे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, श्रीमती अलका पाटील, म. युसूफ, बालनरसय्या अंगली  तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लोकराज्य प्रदर्शन
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाच्या गेल्या चार वर्षातील अंकांचे यानिमित्ताने प्रदर्शन मांडण्यात आले. यामध्ये अनेक संग्राह्य अशा दुर्मिळ अंकाचा समावेश होता. या प्रदर्शनाला अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपाध्यक्षा श्यामल पत्की यांच्यासह मान्यवरांनी तसेच युवक-युवतींना भेट देवून लोकराज्य ऐतिहासिक दस्तावेजाचे अवलोकन केले. या ठिकाणी लोकराज्य अंकांच्या प्रतीची विक्री आणि वार्षिक वर्गणीदार म्हणून नोंदणी करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
*****






No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...