Wednesday, August 8, 2018


कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या
अनुषंगाने दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 8 :- मुदखेड तालुक्यात मुदत संपणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2018 रोजी मतदान व 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी मुदखेड संपूर्ण तालुक्यात मतदान होत असलेल्या गावी दारु विक्री बंद ठेवण्याचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये मुदखेड संपूर्ण तालुक्यात मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाण 10 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून व मतदानाचा दिवस 11 ऑगस्ट रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 12 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद व मुदखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुका होणार आहेत. परंतू मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याने धर्माबाद तालुक्यातील अनुज्ञाप्त्या चालू राहतील, असेही सुधारीत आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...