Wednesday, June 13, 2018


मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत
19 ते 22 जून कालावधीत
लसीकरण मोहीम यशस्वी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
           
नांदेड, दि. 13 :- मिशन इंद्रधनुष्य योजनेंतंर्गत लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात ये आहे. लसीकरणाने गरोदर माता व बालकांचे आजार टाळण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झीने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, मिशन इंद्रधनुष्य मोहिम कार्यक्रमात जिल्ह्यातील निवडलेल्या गावातील माता-बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी आरोग्य विभागासह संबंधीत विभागाने प्रयत्न करावेत. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत या मोहिमेची तिसरी फेरी 19, 20 व 22 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही मोहिम नांदेड, उमरी, बिलोली, धर्माबाद, देगलूर, मुखेड, कंधार, हदगाव, किनवट व अर्धापूर या दहा तालुक्यातील 20 गावात 24 लसीकरण सत्रासाठी निवड करण्यात आलेली आहे. शुन्य ते दोन वयोगटातील बालक तसेच गर्भवती महिलांना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले. 
यापुर्वी प्रथम फेरीत 23, 24 व 26 एप्रिल या कालावधीत 259 वंचित बालकांपैकी 242 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर वंचित  61 गरोदर मातांपैकी 58 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. दुसरी फेरी 21, 22 व 24 मे 2018 या कालावधीत 166 वंचित बालकांपैकी 165 बालकांचे लसीकरण करण्यात आले तर 33 वंचित गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हास्तरावर या मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली औषधी, साधनसामुग्री, मनुष्यबळ आदीचे नियोजन केले आहे. जिल्हा व तालुकास्तर अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षकामार्फत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे संनियंत्रण करण्यात येऊन वंचित बालक व गरोदर मातांचे संपुर्ण लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग प्रमुखांची उपस्थित होत.
00000


No comments:

Post a Comment