Tuesday, May 1, 2018


महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न
मतभेद विसरुन एकतेची भावना जपली पाहिजे
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 1 :- आपसातील मतभेद विसरुन आपण एका कुटुंबातील भारत मातेची लेकरं आहोत अशी एकतेची भावना जपली पाहिजे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींची उपस्थिती होती.   
आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस असून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली म्हणून सर्वांना न्याय मिळाला आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये महाराष्ट्र स्थापनेचा मुहुर्त कळस दिला आणि पहिले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. भाषावाद प्रांतानुसार कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरील 40 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यास इच्छूक आहेत. या मराठी बांधवाचा महाराष्ट्रात समावेश होईल त्यादिवशी संपुर्ण महाराष्ट्र असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी कामगारांना न्याय मिळाला. कामगार दिन 1923 ला पहिल्यांदा मद्रासला साजरा झाला. कामगारांच्या संघटना झाल्या, नौकऱ्या मिळाल्या व खऱ्या अर्थाने आठ तास कामाचा अधिकार कामगारांना मिळाला. कामगार दिन जवळपास ऐंशी देशात साजरा केला जातो. "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" असे सांगून राज्यातील जनतेच्या सामर्थ्याचा, श्रमाचा गौरव करुन पालकमंत्री श्री. कदम यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक एस. डी. राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियानाच्या चित्ररथास पालकमंत्री कदम यांनी हिरवी झेंडी दाखवून रस्ता सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ केला. व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.

पालकमंत्री कदम यांच्या हस्ते
प्रवास पास, पुरस्काराचे वितरण  
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेंतर्गत पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणारा अजीवन मोफत प्रवास पास वीर पत्नी श्रीमती अरुणाताई टर्के ( शहिद ज्ञानोबा गोविंदराव टर्के, मराठा लाइट इन्फ्रर्टी  शहिद दि. 2 मार्च 2003 ऑपरेशन मोहिम ओ.पी. रक्षक जम्मु आणि काश्मिर ) यांना देण्यात आला. आदर्श तलाठी पुरस्कार- आर. एस. वागतकर पांडुर्णा ता. भोकर, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र- भगवान कापकर, अनिलकुमार आदोडे, संभाजी होनराव, शेख हैदर महमद इस्माईल. दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी नांदेड व कृष्णुर पाणीपुरवठा योजनेच्या व जलशुद्धीकरण केंद्रातील बंदीस्त कोरड्या पाण्याच्या टँकमध्ये पेटींग काम करत असताना क्लोरीनेटेड रबर पेटंच्या गॅसमुळे बेशुद्ध पडलेल्या चार कामगारांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल अग्नीशमन अधिकारी अतुल मांगलकर व सहकारी, सन 2016-17 मध्ये कंधार तालुक्यातील डोंगरगाव येथील लिंबोटी धरणाच्या पुरात 16 नागरिकांना व नांदेड शहरातील ड्रेनेजमध्ये पडलेले माणसे, नाल्यामध्ये आडकलेल्या गाई वाचवणे, अपत्तीच्यावेळी विविध ठिकाणी प्रसंगी जिवाची परवा न करता नांदेड, उस्मानाबाद, परभणी व इतर जिल्ह्यात जाऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनपाचे अग्नीशमन अधिकारी शेख रईस पाशा व सहकारी. जिल्हा क्रीडा पुरस्कार : गुणवंत खेळाडू- सुनिल प्रधान, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- लक्ष्मण फुलारी, क्रीडा संघटक- सय्यद अजगर अली पटेल. जिल्हा युवा पुरस्कार- नागोराव भांगे, महेश्वरी तादलापूरकर. शुभंकरोती फाऊंडेशन नांदेड. या सर्व पुरस्कार व पारितोषीक विजेत्यांना पालकमंत्री कदम यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तसेच रोख स्वरुपातील पारितोषीके प्रदान करुन शुभेच्छाही दिल्या.
रोजगार दिनदर्शिकेचे
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते प्रकाशन
राज्य शासनाने 1 ऑक्‍टोंबर 2016 पासून प्रमुख 11 कामे मोहिम स्‍वरुपात घेण्‍यासाठी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत "समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण" योजना सुरू केली आहे. क्षेत्रिय स्‍तरावर या योजनेचा प्रचार होण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने तयार करण्यात आलेल्या रोजगार दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
  या दिनदर्शिके प्रमुख 11 कामांसह रेशीउद्योग विकास योजना, गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली आहे. ही रोजगार दिनदर्शिका नांदेड जिल्‍हयातील सर्व जिल्‍हास्‍तरावरील तसेच तालुकास्‍तरावरील कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालया प्रदर्शित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
000000

No comments:

Post a Comment