Wednesday, February 21, 2018



मराठवाडा वॉटर ग्रीड बाबत महाराष्ट्र शासन इस्त्रायल
पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार
         
मुंबई, दि. 21 : मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन इस्त्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोटयांच्यामध्ये आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार संपन्न झाला.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीयांच्या मंत्रालयीन दालनात संपन्न झालेल्या करारावर मे. मेकोरोट, इस्त्रायल चे चेअरमन मोरडेखाई व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  सदस्य सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
            या कराराच्या अनुषंगाने मे. मेकोरोट, इस्त्रायल कंपनी मराठवाड्यातील उपलब्ध पाणी साठे, पर्जन्य वृष्टी, स्तर रचना, जलाची पातळी, पाणीसाठा, वाहन जाणारे पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणी पुरवठा करण्याचा मास्टर प्लान तयार करून त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल ( PDR ) सादर करणार आहे.  डिसेंबर 2018 अखेर भांडवली कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
            यावेळी बोलताना श्री.लोणीकर म्हणाले, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेतीचे पाणी, उद्योगाला लागणारे पाणी एकत्रित उपलब्ध करुन देण्याबाबत मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. याबाबत मागील महिन्यात इस्त्रायल सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पुढील कामकाज करण्यासाठी इस्त्रायल सरकारची अंगीकृत असलेल्या मे. मेकोरोट कंपनी सोबत सर्वंकष करार करण्यात आला आहे.
            राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होण्यास निश्चित मदत होईल. वॉटर ग्रीडबाबत शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.
          
  मे. मेकोरोट, इस्त्रायल चे चेअरमन मोरडेखाई यावेळी म्हणाले, या कराराच्या अनुषंगाने आमच्या कंपनीमार्फत उत्कृष्ट काम करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने या कामासाठी आमची निवड केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.  मंत्री, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव व अन्य सहकाऱ्यांना इस्त्रायलला येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले.
            यावेळी मुंबई येथील इस्त्रायल चे वाणिज्य दुतावास (Consulate General) श्री. याकोव फिन्कलश्टाईन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल,  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे खागी सचिव बप्पासाहेब थोरात,  मुख अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, चंद्रकांत गजभिये,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता,  मुंबई (मुख्यालय), सुभाष भुजबळ  आदी उपस्थित होते.
0000
विष्णू काकडे/21/2/18/वि.सं./अ.


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...