Wednesday, February 14, 2018


गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे
200 कोटींची केंद्राकडे मागणी करणार
शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत
                                                -- कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

            मुंबई, दि. 14: राज्यात गेल्या चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. कालपर्यंत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साधारणता एक लाख 90 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1800 गावांचा त्यात समावेश आहे. पुढील दोन दिवसात पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल अपेक्षित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार उपस्थित होते.
            कृषिमंत्री यावेळी म्हणाले, शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे 16 जिल्ह्यातील 61 तालुक्यातील 1 हजार 279 गावांमधील 1 लाख 27  हजार 322 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. मात्र दि. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 6 जिल्ह्यांमधील 20 तालुक्यातील 595 गावांतील 61 हजार 361 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नांदेड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात काल झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाचा पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होईल.
            आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली. फळ व शेती पिकांच्या नुकसानासाठी भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा अंतर्गत गारपिटीचा विकल्प दिला आहे अशा शेतकऱ्यांसाठी विमा योजनेतून रक्कम देण्यात येईल. मोसंबी व संत्रा पिकासाठी 23 हजार 300 रुपये प्रती हेक्टरी,  केळीसाठी 40 हजार रुपये प्रती हेक्टरी, आंब्यासाठी 36 हजार 700 रुपये तर लिंबूसाठी 20 हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देण्यात येणार आहे.
            ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला नाही परंतु गारपिटीने त्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार प्रती हेक्टरी 18 हजार रुपयांच्या मर्यादेत मदत देण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
            मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिरायत पिकांसाठी (ज्वारी, मका, गहू, हरभरा,सूर्यफूल) प्रती हेक्टरी 6 हजार 800 रुपये तर सिंचनाखालील जमीनीबाबत 13 हजार 500 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानीबाबत पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.
            सोमवारी झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 232 गावांमधील 20 हजार 177 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यात 7 तालुक्याचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील 3 तालुके, 103 गावे , 10 हजार 260 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 तालुक्यात 40 गावांमधील 2 हजार 150 हेक्टरचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 82 गावामध्ये 1 हजार 725 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 2 तालुक्यांमधील 10 गावातील 140 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील 96 गावांमधील 21 हजार 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील 32 गावांमधील 4 हजार 984 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसांमुळे नुकसानाबाबत माहिती
      बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या 3 तालुक्यातील  42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी, ज्वारी, हरभरा, फळपीके, भाजीपाला यांचा समावेश आहे.
      जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, आंबड या 5 तालुक्यातील  175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
            परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यामधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
            उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
      जळगांव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या 3 तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभऱ्यांचे नुकसान झाले आहे.
            अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगांव, जळगांव-जामूद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ व भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे.
            अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुरजी व चिखलदरा या 8 तालुक्यातील  270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसांन झाले आहे.
            अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर, बार्शी, टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हार या 7 तालुक्यातील 101 गावामधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकाचे नुकसान झाले आहे.
            वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधींल 8 हजार 509 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
            लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाखूर या 5 तालुक्यातील 59 गावांतील 2 हजार 679 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पीकाचे नूकसान झाले आहे.
            हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा या 2 तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पीकाचे नुकसान झाले आहे.
000

No comments:

Post a Comment