Tuesday, January 9, 2018

जलयुक्त शिवार अभियानांची कामे वेळेत पुर्ण करावीत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
 नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार जलसंधारणांतर्गत अपुऱ्या पावसावर दिर्घकालीन उपाययोजना आणि जास्तीतजास्त जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अत्यंत उपयुक्त आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली  डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, देगलूर उपविभागीय अधिकारी व्ही. एल. कोळी, धर्माबाद उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, बिलोली उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, देगलूर तहसीलदार महादेव किरवले, हदगाव तहसिलदार संदीप कुलकर्णी, मुखेड तहसीलदार अतुल जटाळे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता आदि विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गतच्या कामांसाठीचे सन 2017-18 चे तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव तालुकास्तरीय समित्यामार्फत सोमवार 15 जानेवारी पर्यंन्त जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावीत. तसेच नांदेड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असेही  निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले.
तसेच ढाळीचे बांध, अर्दन स्ट्रक्चर, शेततळे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, विहीर पुर्नभरण, सिंनबा गाळ काढणे, शोषखड्डे , साखळी सिमेंट बंधारा , वृक्ष लागवड , रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, खोल सलग समतल चर, रोप वाटिका, रिचार्ज शाफ्ट , साखळी सिंमेट बंधारा , विहिरीतील गाळ काढणे, पाझर तलाव दुरुस्ती, नालाखोलीकरण, गाळ काढणे  सिमेंट नाला बांध आदी विषयांचा यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...