Friday, December 8, 2017

नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा
देण्यासाठी सहकारी संस्थांनी योगदान दयावे
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड दि. 8 :- सामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा देण्यासाठी श्रीगुरुजी रुग्णालयाची सहकारी तत्वावर उभारणी होत असल्याबद्दल कौतूक करुन जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी यासाठी योगदान दयावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
नांदेड येथील नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेच्या नियोजीत श्रीगुरुजी सहकार रुग्णालयाच्या भागधारक नोंदणीचा शुभारंभ ना. देशमुख यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबु गंजेवार होते तर आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस,  किशोर भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.  
सहकारी तत्वावरील रुग्णालयाच्या उपक्रमाला शुभेच्छा देवून ना. देशमुख म्हणाले की , वाढती महागाई व आरोग्याचे भेडसावणारे प्रश्न यामध्ये सामान्य माणसाला होणारा त्रास लक्षात घेवून हा उपक्रम नांदेडकरांना फायदाचा ठरणार आहे. या सहकारी रुग्णालयासाठी सर्वसामान्य नागरीकांसोबतच मान्यवर, पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील संस्थांनी आपल्या नफ्याचा वाटा यासाठी दयावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भागधारकासाठी संस्थेने विशेष योजना केली असून नागरिकांनी या योजनेंचा फायदा घ्यावा व संस्थेने आरोग्य सेवेसाठी नियोजीत केलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा. सहकारी तत्वावर अलीकडे राज्यात काही प्रमाणात रुग्णालयाची उभारणी होत आहे. कमी खर्चात उत्तम आरोग्य सेवा देण्याचा हा प्रयत्न असून या प्रयत्नांना सर्व स्तरातील नागरिकांनी पाठबळ दिले पाहिजे. या उपक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होत असल्याने हा उपक्रम यशस्वी ठरेल आणि सहकार्यातून सहकार समृद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आ. हेमंत पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छा देवून स्वत: भाग खरेदी केल्याची व बँकेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली. याबाबत आ. पाटील यांच्यासह योगदान देणाऱ्या माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राम लोहिया व मान्यवरांचा भागधारक झाल्याबद्दल भाग प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच सहकार मंत्री ना. देशमुख यांनीही एक लाख रुपयाचे योगदान घोषीत केल्याबद्दल यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात रुग्णालयाचे अध्यक्ष सुधीर कोकरे यांनी रुग्णालयाच्या उभारणी मागील भुमिका स्पष्ट केली.
अध्यक्षीय समारंभात बाबुराव गंजेवार यांनी सर्वांच्या सहकार्यातून या सहकारी तत्वावरील रुग्णालयाची उभारणी होत असून यासाठी सर्वांनी सामाजिक भावनेतून योगदान दयावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पुराणीक यांनी केले तर आभार डॉ. मुकुल जोशी यांनी मानले. यावेळी नागरिकांनी भागधारक नोंदणी मोठ्या प्रमाणात केली.
भाग्यलक्ष्मी सहकारी बँकेस भेट
नांदेड येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँकेस राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार हेमंत पाटील, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक पी. आर. फडणीस, राम पाटील रातोळीकर, बँकेचे अध्यक्ष शैलाताई मदनुरकर, उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर कुलकर्णी, संचालक डॉ. श्रीकांत लव्हेकर, दत्तोपंत देबडवार, श्रावण पाटील, गंगाधर जोशी, बालाजीराव देशपांडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, व्यंकटेश साठे आदींची उपस्थिती होती.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...