Monday, October 30, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
अर्ज करण्यास 15 नोव्हेंबरची मुदत
नांदेड दि. 30 :- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" या योजनेअंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास बुधवार 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती नांदेड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती अर्जासोबत जोडल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन करावे. निकष, अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. अर्जाचा विहित नमुना https://sjsa.maharashtra.gov.in https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढले आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष, टपालाद्वारे कार्यालयाच्या ई-मेलवर 15 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. अपुर्ण भरलेले आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील. 60 टक्केपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. जिल्हा निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ दयावयाची संख्या निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड यादी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यलयामार्फत प्रसिद्ध केली जाईल. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत असले.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना" या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासन निर्णय 6 जानेवारी 2017 अन्वये विहित करण्यात आलेली रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये उपलब्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...