Wednesday, September 13, 2017

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
ई-सेवा केंद्र दोन दिवस 24 तास सुरु राहणार
                                                          - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 13 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार 15 सप्टेंबर 2017 आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र हे दोन दिवस 24 तास सुरु ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2017 या मुदतीच्या आतच भरावेत. या तारखेनंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनाचे निर्देश आहेत. म्हणून जिल्ह्यातील ही ई-सेवा केंद्रे येत्या दोन दिवस 24 तास सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. 1 एप्रिल 2009 नंतर पूर्नरचना झालेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 2 लाख 59 हजार 259 शेतकरी कुटुंबांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत केलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्यास त्यांनी तहसिलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.
शासनाने आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाईन यादीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिंक http://csmssy.in या संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी. संकेतस्थळ मराठी सर्वांना समजेल असे आहे. संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदाराची यादी अशा विभाग आहे. हा विभाग निवडावा आणि संकेतस्थळ उघडल्यावर आपला जिल्हा, त्यानंतर तालुका व गाव निवडावे. आपल्या गावाची यादी आपल्या समोर येईल. आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी आणि नाव नसेल तर परत ऑनलाईन अर्ज भरावा, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...