Saturday, September 9, 2017

जिल्ह्यातील सर्व शाळा फूटबॉलमय व्हाव्यात
                                  - जिल्हाधिकारी डोंगरे  
महाराष्ट्र मिशन एक मिलीयन फूटबॉल अंतर्गत
15 सप्टेंबरला जिल्ह्यातील 30 हजार खेळाडू खेळणार फूटबॉल
नांदेड दि. 9 :- फिफा फूटबॉल वर्ल्डकप 2017 अंतर्गत फूटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मिशनएक मिलीयन फूटबॉल सामन्याचे आयोजन नांदेड शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. यानिमित्ताने सर्व शाळा फूटबॉलमय व्हाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी रु डोंगरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाच्या आवाहनानुसार शिक्षण विभाग जिल्हा क्रिडा अधिकारी नांदेड यांच्यावतीने आयोजिन मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा संयोजक आदींच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नांदेड वाघाळा मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, संतोष कंदेवा, शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री गोरे, शिवाजीराव खुडे, मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादवशिवछत्रपती पुरस्कार विजेते रामलू पारे, फूटबॉलचा आंतरराष्ट्रीय  खेळाडू जगदीश गादेवाड आदींची उपस्थिती होती.
ऑक्टोबर महिन्यात आयोजित 17 वर्षांखालील जागतिक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन भारतात 6 ठिकाणी करण्यात आले आहे, पैकी महाराष्ट्रात डी.वाय. पाटील स्टेडीयम नवी मुंबई येथेही हे सामने होणार आहेत.  त्यासाठी वातावरण निर्मिती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांत खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील संपूर्ण शाळांमधून येत्या 15 सप्टेंबर रोजी फूटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
            यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, खेळातून एक सकस मन तयार होते. आज जगात अनेक खेळ खेळले जातात. परंतु आज व्यस्त शिक्षण संस्कृती मोबाईल गेममध्ये गुरफटून गेलेली मुले अभावानेच मैदानावर खेळताना दिसतात. यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला खिळ बसत आहे. म्हणून शिक्षक, पालकांसह सर्वांनी खेळाला प्राधान्य देवून खेळाडू तयार करावेत असेही श्री. डोंगरे म्हणाले.
            नांदेड वाघाळा महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले की, फूटबॉल स्पर्धेची वातावरण निर्मीती करण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. यासाठी इंदिरा गांधी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना रात्रीच्यावेळीही खेळण्यासाठी मैदानावर फ्लडलाईटची व्यवस्था केल्याचे त्यानी यावेळी सांगितले.
            यावेळी प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री गोरे म्हणाल्या की, शालेय स्तरापासून खेळातूनच  शिक्षण प्रक्रिया राबवली गेली पाहिजे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांतील शक्ती सामर्थ्य ओळखून त्यांच्यातील क्रीडा वृत्तीला चालना द्यायला हवी. या फूटबॉल सामन्याच्या निमित्ताने 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हा फूटबॉलमय झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी नियोजनाची मिका विषद करताना सांगितले की, संपर्ण जिल्हा फूटबॉलमय करण्यासाठी  जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडून शासनाच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या शाळांना फूटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे. शाळांनी उपलब्ध असलेल्या मैदानावर 15 सप्टेंबरला समारंभपूर्वक फूटबॉलचे सामने घ्यावेत त्याचे चित्रीकरणही करण्यात यावे, असे आवाहनही श्री. यादव यांनी केले.
यावेळी मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावरील नियोजित सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू जगदीश गादेवाड याचा सत्कार करण्यात आला. बैठक यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी सय्यद साजिद, एम.जे. सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, पदमाकर कुलकर्णी, आनंद जोंधळे, मोहन पवार, चंद्रकांत गव्हाणे, सुभाष धोंगडे, लक्ष्मीकांत रोटे, हनमंत नरवाडे, नारायण सूर्यवंशी, संजय भालके आदींनी परिश्रम घेतले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...