Wednesday, August 16, 2017

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे
तपासुन पुर्ण करावीत  - पालकमंत्री खोतकर   
नांदेड दि. 16 :- पर्जन्यमान कमी असल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये, यासाठी संबंधीत यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासुन पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.       
जलसंपदा लघुसिंचन, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे, जलसंपदा नांदेड पाटबंधारे दक्षीण, उत्तर विभागांतर्गत  कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आढावा बैठक पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सबीनवार, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
पालकमंत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले की, टंचाई व अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे गेट उघडता व बंद करता आली पाहिजे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 18 नंबर गेटची व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी. प्रकल्पातील पाणी वाहुन जाणार नाही याबाबत दक्षता घेऊन दुरुस्तीची कामे पुर्ण करावीत. पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाऱ्यातील साठलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे. गेटची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त गेटसाठी, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधीत विभागाकडुन किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाऱ्याची देखभाल पुर्ण करावी. यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क राहून त्याबाबत तयारी करावी. जिल्हाधिकारी नांदेड यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांना भेटी देऊन पाहणी करावी. त्याबाबत कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. खोतकर यांनी दिल्या.  
जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या 176 असून संकलीत गेटची संख्या 12 हजार 465 आहे. कार्यरत असलेल्या गेटची संख्या 8 हजार 671, नादुरुस्त गेटची संख्या 3 हजार 794 आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...