Tuesday, June 20, 2017

महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नोंदणीस सुरुवात
जास्तीत जास्त तरुणांच्‍या सहभागाचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन
                नांदेड दि. 20 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तरूण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्‍याकरीता जिल्‍हयात प्रत्‍येक महाविद्यालयात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. या मोहिमेत जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त तरूण व पात्र प्रथम मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे. 
महाविद्यालयीन प्रवेशाच्‍या वेळी नोंदणी
                दिनांक 1  जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतील. अर्जासोबत बोनाफाईड व वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणासाठी जोडपत्रात माहिती दयावी लागेल. नोंदणीसाठी लागणारे कोरे अर्ज व जोडपत्र जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयात पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत.  सर्व विद्यार्थ्‍यांनी प्रवेशाचे वेळी कोरे अर्ज मागून घेवून ते परिपूर्ण भरून महाविद्यालयातच जमा करावेत.
शाळा / महाविद्यालयात विविध स्‍पर्धांचे आयोजन
                मतदार नोंदणीबाबत तरुणांमध्‍ये जागृती व्‍हावी या दृष्‍टीने प्रत्‍येक तालुक्‍यात चित्रकला स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

8 जुलै व 22 जुलै रोजी विशेष मोहिम
                या मोहिमे अंतर्गत 8 जुलै व 22 जुलै या दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्‍यात येणार आहेत. या दिवशी जिल्‍हयातील सर्व  बीएलओ हे त्‍यांच्‍या केंद्रावर हजर राहून अर्ज स्‍वीकारतील.

 वय 21 पेक्षा जास्‍त असल्‍यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र आवश्‍यक
                मतदाराची दुबार नोंदणी होवू नये यादृष्‍टीने ज्‍या व्‍यक्‍तीचे वय 21 पेक्षा जास्‍त असेल त्‍यांना अर्ज करतांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दयावे लागेल. एखादया मतदाराची नोंदणी पुर्वीच झालेली असेल व नवीन वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी नोंदणी करावयाची असल्‍यास पूर्वीच्‍या ठिकाणी नाव वगळण्‍यासाठी अर्ज सादर केल्‍याचा पुरावा सादर करावा लागेल. मतदारांना नोंदणीसाठी अडचण होवू नये यादृष्‍टीने सर्व अर्जाचे नमूने सुटसुटीत व सोपे करण्‍यात आलेले आहेत.
            या मोहिमेत जिल्ह्यातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व तपशीलासाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे. मोहिमेबाबत अधिक माहिती व तपशील आवश्यक असल्यास उपजिल्हा निवडणूक कार्यालय, नांदेड- दूरध्वनी क्र. 02462-235762 येथेही संपर्क साधता येईल.

0000000

No comments:

Post a Comment