Thursday, June 1, 2017



मुर्तस्वरुपातील कामांमुळे शेवटच्या घटकांपर्यंत
पोहचून काम करण्याची प्रेरणा – अर्थमंत्री मुनगंटीवार

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वासवी माता परमेश्र्वरी भवनाचे उद्घाटन संपन्न

नांदेड दि. 1 :- समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून, सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा वासवी माता परमेश्वरी भवनसारख्या मुर्तस्वरुपातील कामांमुळे प्राप्त होत असते, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वासवी माता परमेश्र्वरी भवनचे उद्घाटन मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले, या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण होते. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच तामीळनाडुचे माजी राज्यपाल के. रोशैय्या हे प्रमुख उपस्थित होते. आंबेडकर चौक-सिडको रोड परिसरात उभारण्यात आलेल्या नूतन भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, भाजपा प्रदेश व्यापारी आघाडीचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, व्यंकटेश गादेवार, रमेश पारसेवार, प्रशांत निलावार, माणिक शेटे, सुधाकर गोविंदवार, भानुदास वट्टमवार यांच्यासह महासभेचे राज्यभरातील पदाधिकारी, प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात मुनगंटीवार म्हणाले की, आर्य वैश्य समाजाने या भवनाच्या निर्मितीतून, चांगले उदाहरण पुढे आणले आहे. यातून समाजाला चांगली प्रेरणा मिळेल. ज्या-ज्या चांगल्या गोष्टींची मनोकामना असेल, ती पुर्ण करण्याच्या दृष्टीने हे भवन प्रेरणा देत राहील. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करण्याची अंत्योदयाची संकल्पना अशा कामातून पुर्ण करता येईल. संघटीत समाजाकडून सर्वांसाठी काम करण्याची संधी या कामातून मिळाली आहे. या भवनच्या उत्पन्नातील काही वाटा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याची बांधिलकी कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
माजी मुख्यमंत्री के. रोशैय्या यांनीही आर्य वैश्य समाज हा वैशिष्ट्यपुर्ण आणि स्वयंपुर्ण समाज असल्याचा उल्लेख केला.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार चव्हाण यांनी वासवी माता परमेश्र्वरी भवन नांदेडच्या वैभवात भर घालणारी वास्तू ठरेल, असा विश्र्वास व्यक्त केला.

दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सचिव गोविंद बिडवई यांनी प्रास्ताविक केले. महासभेचे अध्यक्ष श्री. गादेवार, बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वासवी रत्न या विशेषांकाचे तसेच समाजाच्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नमुनाप्रतीचेही प्रकाशन करण्यात आले. हॅलो आर्य वैश्य डॅाट कॅाम या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी सुरवातीला अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वासवी माता परमेश्र्वरी भवनचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. श्री. के. रोशैय्या यांच्या हस्ते विश्र्वंभर पारसेवार भोजन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...