Friday, May 19, 2017

तत्कालीन जिल्हाधिकारी काकाणी यांना भावपूर्ण निरोप ;
नूतन जिल्हाधिकारी डोंगरे यांचे उत्स्फुर्त स्वागत
नियोजन भवन येथे संयुक्त समारंभ संपन्न  
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी व विविध महसूल संघटनेच्यावतीने नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. हा संयुक्त समारंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात काल संपन्न झाला.  
या समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सौ. ज्योती काकाणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध महसूल संघटनाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देवून मावळते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निरोप तर नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध महसूल संघटनाच्यावतीनेही पुष्पगुच्छे देवून सत्कार करण्यात आला. तसेच श्री. काकाणी यांच्या संकल्पनेवर आधारीत नांदेड जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने "इसापूर ते बाभळी" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर "प्रवास जलसमृद्धीचा" हा माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला.
प्रशासकीय सेवेच्या संधीचा उपयोग सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्याचे ध्येय समोर ठेवून काम केल्याने व त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याने गेल्या दोन वर्षाच्या काळात अडचणी न येता जिल्ह्यात विविध विकासात्मक व अभिनव उपक्रम राबवू शकलो, असे भावपूर्ण उद् गार  श्री. काकाणी यांनी काढले.
जिल्ह्यात सांघीक प्रयत्नातून जलयुक्त शिवार अभियान, अन्न सुरक्षा योजना, वंचितांना न्याय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, टंचाई परिस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींमध्ये चांगले काम करता आले. जनतेच्या प्रश्नातूनच कामाला दिशा मिळते. आपली भुमिका स्पष्ट ठेवून निष्ठेने, गतीमानतेने पारदर्शकरित्या काम केले तर यश मिळते असे सांगून श्री. काकाणी यांनी नूतन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सर्वाचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाज सेवेचे व्रत घेवून श्री. काकाणी यांनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी आहे , अशा शब्दात त्यांचे कामाचा गौरव करुन श्री. डोंगरे म्हणाले की , आदिवासी बहुल किनवट परिसरावर विकासाचे लक्ष केंद्रीत केले जाईल. सर्वांच्या सहकार्यातून नांदेड विकासाचे मॉडेल तयार केले जाईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही श्री. काकाणी व डोंगरे यांच्या जुन्या व नव्या आठवणींना उजाळा देवून गौरवपर भाषणे केली.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी दिपाली मोतीयेळे , तहसिलदार व्यंकटेश मुंढे, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे, महसुल विभागाचे शालिनी धुळे, कुणाल जगताप, लक्ष्मण नरमवार, हयून पठाण यांनी आपल्या भाषणात श्री. काकाणी यांच्या नेतृत्व गुण व कामासंबंधी खास शब्दात उल्लेख केला.  
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविकात संयमी स्वभाव, दृढनिश्चय व करारी वृत्तीचे श्री. काकाणी होते, असे सांगून त्यांचे स्वभावाच्या अनेक पैलुंचा उलगाडा केला. समारंभाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी व सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी केले तर तहसिलदार डॉ. अरविंद नरसीकर यांनी आभार मानले.
या समारंभास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment