Sunday, May 21, 2017

डीबीटीद्वारे खत विक्रीचे प्रशिक्षण
जिल्हा परिषदेत संपन्न
नांदेड, दि. 21 :-  येत्या खरीप हंगामसाठी डीबीटीद्वारे खत विक्री ई-पॉस (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात काल संपन्न झाले. यावेळी शिक्षण आरोग्य समितीचे सभापती माधवराव मिसाळे, कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कल्याण समितीचे सभापती सौ. शिला निखाते तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, येत्या 1 जून पासून रासायनिक खताची विक्री ई-पॉस  (e-Pos) मशिनद्वारे होणार असून याबाबत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यात यावा.  बियाणे खते मिळणेबबत सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडावा, चांगले काम व्हावे शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण आरोग्य समिती सभापती श्री. मिसाळे म्हणाले की, कृषिनिविष्ठा विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणीकपणे करावा. कोणावरही कार्यवाही करण्याची वेळ येऊ नये तसेच येणाऱ्या तक्रारीची शहाणीशा करुनच कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार माधवराव पाटील म्हणाले की,  ई-पॉस  (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण परिपर्ण घेऊन येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेत बियाणे खते उपलब्ध होतील याची सर्वांनी काळजी घ्यावी. व्यापाऱ्याचे प्रश्न सोडविण्यात येथील असेही सांगितले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, कृषि विभागामार्फत डीबीटी प्रकल्प राबविण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही कौतूकास्पद आहे. खत विक्रेत्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन डीबीटी प्रकल्प यशस्वी करावा.  शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे, योग्य किंमतीत योग्यवेळी कृषिनिविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. तसेच निविष्ठा वाटपादरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.  
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी जिल्हयाची सर्वसाधारण माहिती तसेच खरीप हंगाम 2017 मध्ये लागणारे  बियाणे खते पुरेशे प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. तसेच  खरीप हंगामासाठी जिल्हा तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना, निविष्ठा उपलब्धतेबाबत नियंत्रण कक्ष, विक्री केंद्रावर शासनाचे टोल फ्री क्रमांकाचे भरारी पथकाचे क्रमांकाचे फ्लेक्स लावण्यात येत असून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उपलब्ध दर्जा तसेच अडचणीबाबत याचा उपयोग होणार असल्याची माहिती दिली. गुरुवार 1 जून 2017 पासून रायायनिक खताची विक्री e-Pos मशिनद्वारे होणार असून त्यासाठी सर्व खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. e-Pos मशिनचे 20 मे रोजी भोकर, देगलूर, मुखेड, बिलोली   किनवट, माहूर , हिमायतनगर, हदगांव या तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये 1 हजार 100 खत विक्रेत्यांना e-Pos मशिनचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती  कृषि विकास अधिकारी श्री. मोरे यांनी  दिली.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य श्री. सरोदे,श्री. एलमगोंडे, नांदेड जिल्हा कृषिनिविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, खत कंपनीचे प्रतिनिधी श्री. संजयकुमार, शिवा ग्लोबल इन्डस्ट्रीजचे श्री. वेणीकर खत विक्रेते, आदी उपस्थित होते. उपस्थितीत पदाधिकारीखत विक्रेते, खत कंपनी अधिकारी यांचे आभार मोहीम अधिकारी ए.जी. हांडे यांनी मानले. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...