Wednesday, May 31, 2017

नव मतदारांच्या नोंदणीसाठी
 जिल्ह्यात 1 जुलै पासून विशेष मोहिम
जास्तीत जास्त सहभागाचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन

                नांदेड दि. 31 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तरूण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्‍याकरीता जिल्‍हयात रविवार 1 जुलै ते मंगळवार 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेत जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त तरूण व पात्र प्रथम मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे. 
            या मोहिमेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.
बीएलओची घरोघरी भेट
                विशेष मोहिमे अंतर्गत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ त्‍यांच्‍या क्षेत्रातील घरांना 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भेट देतील आणि मतदारांची नोंदणी, वगळणी, व दुरूस्‍तीसाठी अर्ज नोंदवून घेतील. याशिवाय नागरिकांना संबंधित तहसिल कार्यालयात किंवा भारत निवडणूक आयोगाच्‍या www.nvsp.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन अर्ज करता येतील. 
8 जुलै व 22 जुलै रोजी विशेष मोहिम
                या मोहिमे अंतर्गत 8 जुलै व 22 जुलै या दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्‍यात येणार आहेत. या दिवशी जिल्‍हयातील सर्व  बीएलओ हे त्‍यांच्‍या केंद्रावर हजर राहून अर्ज स्‍वीकारतील.
महाविद्यालयीन प्रवेशाच्‍या वेळी नोंदणी
                दिनांक 1  जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतील. अर्जासोबत बोनाफाईड व वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणासाठी जोडपत्रात माहिती दयावी लागेल.
 वय 21 पेक्षा जास्‍त असल्‍यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र आवश्‍यक
                मतदाराची दुबार नोंदणी होवू नये यादृष्‍टीने ज्‍या व्‍यक्‍तीचे वय 21 पेक्षा जास्‍त असेल त्‍यांना अर्ज करतांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दयावे लागेल. एखादया मतदाराची नोंदणी पुर्वीच झालेली असेल व नवीन वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी नोंदणी करावयाची असल्‍यास पूर्वीच्‍या ठिकाणी नाव वगळण्‍यासाठी अर्ज सादर केल्‍याचा पुरावा सादर करावा लागेल. मतदारांना नोंदणीसाठी अडचण होवू नये यादृष्‍टीने सर्व अर्जाचे नमूने सुटसुटीत व सोपे करण्‍यात आलेले आहेत.
मयत व स्‍थलांतरीत मतदारांची वगळणी
                या मोहिमेमध्‍ये नवीन मतदारांच्‍या नोंदणी सोबतच बीएलओ घरोघरी भेट देतांना मतदार यादीतील मतदार मयत असतील तर त्‍यांची माहिती घेतील तसेच स्‍थलांतरीत मतदाराचीही माहिती घेतील योग्‍य चौकशीनंतर मयत, स्‍थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येणार आहे.
            या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व तपशीलासाठी संबंधीत बीएलओ किंवा तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे. मोहिमेबाबत अधिक माहिती व तपशील आवश्यक असल्यास उपजिल्हा निवडणूक कार्यालय, नांदेड- दूरध्वनी क्र. 02462-235762 येथेही संपर्क साधता येईल.
0000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...