Tuesday, April 25, 2017

शोध वंचिताचा,शुद्धीकरण आणि प्रतिसादद्वारे
नांदेड तहसीलची मतदार यादी अद्ययावतीकरण मोहीम
नांदेड, दि. 25 :- जिल्हाधिकारी कार्यालय व मतदार नोंदणी अधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तहसीलच्या निवडणूक विभागाने नियमित पुनरिक्षण कार्यक्रमासोबतच  मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करण्यासाठी 'शोध वंचितांचा’, तर मयत स्थलांतर मतदार वगळणी साठी 'शुद्धीकरण' आणि सध्य मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी 'प्रतिसाद' अशी विशेष तिहेरी मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.
यात मतदार यादीत नाव समाविष्ट नसणाऱ्या वंचित घटकांपर्यत पोहोचण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची सुरूवात कचरा गोळा करणारे शांतीनगर भागातील वंचित घटकांपासून करण्यात आली. बीएलओ सह तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची टीम सकाळी आठ वाजता या भागात पोहोचली. याठिकाणी सहा क्रमांकाचे फार्म वाटप करून कर्मचारी सहाय्याने भरून घेण्यात आले. इतर दुरुस्त्या व कार्ड नसणाऱ्यांचीही नोंद करण्यात आली.  या वंचित घटकांपर्यत पोहचण्यासाठी अनूलोम, भरारी ,एड्स जनजागृती सोसायटी या सारख्या स्वयंसेवी संस्थाप्रमाणेच इतर कामगार, मजूर, हमाल यांच्यापर्यंत कामगार कार्यालय, अपंग लाभार्थ्यांपर्यंत समाजकल्याण जि.प मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यांच्या नावनोंदणी साठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मयत मतदार वगळणी साठी महानगरपालिका व पंचायत समिती, तलाठी ,बीएलओ मार्फत माहिती संकलित करून अशा व्यक्तींची वगळणी मतदार यादीतून 31 मे पर्यंत केली जाणार आहे.
नांदेड तालुक्यातील सध्या मतदारांना मतदान कार्ड नसणे नावात फरक, यादीतील भाग बदल आदी बाबतीत कोणत्याही अडचणी सोडविता येणार आहेत. तक्रार किंवा अर्ज किंवा तोंडी माहिती मिळताच त्यांची  लेखी नोंद  प्रतिसाद नोंदवहीत केली जावून,  त्याच दिवशी मतदाराची अडचण सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या तिहेरी मोहिमेचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा व मतदार यादी  अधिक सर्वसमावेशक बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार किरण अंबेकर व नायब तहसिलदार निवडणूक श्रीमती स्नेहलता स्वामी यांनी केले आहे. 

000000

No comments:

Post a Comment