Sunday, December 18, 2016

अल्पसंख्याकाच्या विकास योजनांसाठी
प्रशासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी काकाणी
अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रम साजरा
नांदेड दि. 18 :- अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. समाजाच्या शैक्षणीक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना नेहमीच प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे सांगीतले. या समाजातील तरुणांनी शिक्षण आणि आपल्या स्वत:च्या क्षमता विकासावर लक्ष केंद्रीत करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमा डॉ. राजवंत सिंघ कदम्‍ब, डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांचीही व्याख्याने झाली.
कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेचे संचालक जी. बी. सुपेकर, अल्पसंख्याक विकास समिती सचिव तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड, जुबेर अहमद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, मौलाना आझाद विकास महामंडळाचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अल्‍पसंख्‍यांक समाज विविध धर्म, जाती, पंथ, प्रांत, भाषा, प्रथा, परंपरा यामध्ये विखुरला आहे. पण घटनेने देशाती सर्व घटकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक याबाबत समान अधिकार दिलेली आहेत. अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून साजरा करताना अल्‍पसंख्‍यांकांच्‍या उन्‍नतीसाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल.  कमतरतांवर कशी मात करता येईल आणि नेमकी बलस्थाने काय काय आहेत यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. अल्पसंख्याक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्‍युवृतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करणे, त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे समुह करून विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणे असे प्रयत्न करता येतील. पोलीस भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्गासाठी अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धा असायला पाहिजे, जास्‍तीत जास्‍त संख्येने लाभ घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या विविध समाजातील तरुणांनी डिजीटायझेशनच्या युगातील कौशल्य आत्मसात करावीत. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकासांच्या प्रशिक्षण, योजनांमध्ये सहभाग घ्यावा. त्याद्वारे आपली आणि समाजाची उन्नती साधावी, अशी अपेक्षाही श्री. काकाणी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट रोकडरहित (कॅशलेस) व्यवहार, आधार लिंकिंग अशा संकल्पनाबाबतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाडॉ.राजवंतसिंघ कदम्‍ब आणि डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांची अल्‍पसंख्‍यांक नागरिक त्‍यांच्‍या घटनांत्‍मक व कायदेशीर हक्‍कांची जाणीव-माहिती बदल राज्‍यघटनेत असलेल्‍या विविध कलमांच्‍या संदर्भात माहिती सांगितली. अल्‍पसंख्‍यांकांना राष्‍ट्रीय विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहातील समावेशाची आवश्‍यकतेबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच शेवटी आभारही मानले.

000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...