Friday, November 25, 2016

कामगारांचे पगार बँकामार्फत देण्यासाठी
खाते उघडण्यासाठी विशेष सुविधा
नांदेड शहरात दोन ठिकाणी, धनेगावातही आज विशेष व्यवस्था
नांदेड, दि. 25 :- संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे पगारही बँकाच्या माध्यमातून व्हावेत, यासाठी कामगार वर्गातील ज्या लोकांकडे बॅंकखाते नाही अशांना खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार ज्या कामगारांचे  बँक खाते नाही, अशांचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत उद्या शनिवार 26 नोव्हेंबर 2016 रोजी विशेष बाब म्हणून शहरात दोन ठिकाणी तर धनेगाव येथे एक अशा तीन ठिकाणी बँकामध्ये खाते उघडण्यासाठी व्यवस्था केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. या सुविधांचा कामगार वर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय व राज्याच्या मुख्य सचिवांकडून जिल्हा प्रशासनाला निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, सहायक कामगार आयुक्त व अन्य अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. त्यानुसार शनिवार 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष बाब म्हणून सुट्टीच्या दिवशीही या तीन ठिकाणी बँक अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून खाते उघडणार आहेत. नांदेड शहरात कलामंदीर परिसरातील अॅक्सीस बँक, महावीर चौक परिसरातील पंजाब ॲण्ड सिंध बँक तर धनेगांव येथील स्टेट बँक आँफ हैद्राबाद याठिकाणी खाते  उघडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी खाते उघडण्यासाठी संबंधितांनी आपले कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र व दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, रहिवासाचा पुरावा, तसेच आधारकार्ड आणावे लागेल. कष्टकरी जनतेने या सुविधेचा लाभ घेऊन आपले बॅंक खाते सुरु करावे. हे खाते शुन्य बॅलन्स तत्त्वावरही उघडता येणार आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
शनिवार नंतर पुढे सोमवार 28 नोव्हेंबरपासून बँकिंग वेळेत नेहमीप्रमाणे कामगार वर्गाची खाते उघडण्यासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या कामगार वर्गानेही वेळेत खाती उघडावीत, जेणेकरून बँकेद्वारेच त्यांचे पुढील काळातील पगार देता येतील. त्यासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकामध्ये लवकरात लवकर खाते उघडण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...